You are currently viewing छत्रपती शिवाजीमहाराज हे जाणता राजा! – गणेश ठोकळ

छत्रपती शिवाजीमहाराज हे जाणता राजा! – गणेश ठोकळ

*छत्रपती शिवाजीमहाराज हे जाणता राजा! – गणेश ठोकळ*

*मधुश्री व्याख्यानमाला – प्रथम पुष्प*

पिंपरी

‘सदैव सर्वसामान्य रयतेच्या कल्याणाचा विचार केला म्हणून छत्रपती शिवाजीमहाराज यांना ‘जाणता राजा’ असे म्हटले जाते!’ असे प्रतिपादन गणेश ठोकळ यांनी स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह, निगडी प्राधिकरण येथे बुधवार, दिनांक ०६ मे २०२६ रोजी केले. मधुश्री कला आविष्कार आणि स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था, निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेत ‘स्वराज्याचा अपरिचित इतिहास’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना गणेश ठोकळ बोलत होते. लायन्स क्लब इंटरनॅशनलचे माजी रिजन चेअरमन दामाजी आसबे अध्यक्षस्थानी होते; तसेच नगरसेविका शैलजा मोरे, मधुश्री कला आविष्कारच्या अध्यक्षा माधुरी ओक, कार्याध्यक्ष सलीम शिकलगार,
सचिव राजेंद्र बाबर, कोषाध्यक्ष अजित देशपांडे, दत्तोपंत म्हसकर संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. माधुरी ओक यांनी प्रास्ताविकातून यांनी सोळाव्या वर्षात पदार्पण करणार्‍या मधुश्री व्याख्यानमालेची तसेच मधुश्री संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. दामाजी आसबे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘व्याख्यानमाला ही महाराष्ट्राची समृद्ध परंपरा असून मधुश्री व्याख्यानमालेच्या माध्यमातून सोळा वर्षांपासून विचारांचे आदानप्रदान केले जाते, ही स्तुत्य बाब आहे!’ असे गौरवोद्गार काढले.

गणेश ठोकळ पुढे म्हणाले की, ‘ज्ञानेश्वरमाउलींसारख्या संतांची मांदियाळी असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या महाराष्ट्रात आपण जन्मलो हे आपले अहोभाग्य आहे. शहाजीराजे आणि जिजाऊ यांचा विवाह निजामाच्या मध्यस्थीने झाला. भोसले आणि जाधव घराणे यांच्यात वितुष्ट आल्याने शिवनेरीचे किल्लेदार सिधोजी विश्वासराव यांच्या भरवशावर गर्भवती जिजाऊ माँसाहेब यांना शिवनेरीवर ठेवण्यात आले. शिवरायांना जन्मापासूनच संघर्ष सहन करावा लागला. शिवनेरीवर दोन वर्षे वास्तव्य करून बालशिवाजीसह जिजाऊंनी दोन वर्षे वेरूळ आणि पुन्हा शिवनेरीवर वास्तव्य केले. त्यानंतर माहुली गडावर एक वर्ष वास्तव्य केल्यानंतर खेडेबारे (खेड शिवापूर) येथे बापूजी देशपांडे यांच्या वाड्यात नंतर बंगळूर येथे तीन वर्षे वास्तव्य करून पुण्यातील लालमहाल येथे जिजाऊ माँसाहेब वास्तव्यास आल्या. शिवरायांनी संस्कृतमध्ये आपली राजमुद्रा निर्माण केली. वयाच्या सव्विसाव्या वर्षी त्यांनी खेड शिवापूर येथे पहिले धरण बांधले. महाराजांनी राज्याभिषेकानंतर ‘छत्रपती’ हे बिरुद धारण केले. छत्रपती शिवाजीमहाराज आणि जगद्गुरू तुकोबाराय यांची भेट शौर्य आणि भक्तीचा संगम मानली जाते. मीर मुहम्मद याने सर्वात प्रथम शिवाजीमहाराज यांचे चित्र रेखाटले; तर डच गव्हर्नर व्हॅलेंटाइन याने प्रत्यक्ष समोरून काढलेले चित्र लंडन येथील संग्रहालयात ठेवण्यात आले होते. त्याचा शोध घेऊन इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांनी ते सर्वत्र पोहोचवले. हिरोजी इंदुलकर यांनी रायगडाचे बांधकाम केले; तर चिमाजी प्रभू हे राजगडाचे वास्तुविशारद होते. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्यावर दैवी कृपा होती. त्यांना आपल्या कारकिर्दीत तीन वेळा धनलाभ झाला. तानाजी मालुसरे यांच्या हौतात्म्यानंतर त्यांचा पुत्र रायबा मालुसरे याचा विवाह महाराजांनी लावून दिला; आणि पारगड या किल्ल्याचा पहिला किल्लेदार म्हणून त्याची नियुक्ती केली. १६७८ मध्ये कर्नाटक मोहिमेवर सकुजी गायकवाड या सरदाराने मल्लमा देसाई यांच्याशी बदसलुख केल्यावर महाराजांनी त्याचे डोळे काढून घेण्याची सजा दिली होती. यादवाड या गावी मल्लम्मा देसाई यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांचे पहिले शिल्प मंदिर उभारले. सर्वाधिक समुद्री किल्ले बांधणारा राजा हा विश्वविक्रम शिवाजीमहाराज यांच्या नावावर आहे!’ अभिनिवेशपूर्ण शैलीतून ठोकळ यांनी विषयाची मांडणी केली.

अश्विनी कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, उज्ज्वला केळकर, चिंतामणी कुलकर्णी, मनीषा मुळे, चंद्रकांत शेडगे, राजू जाधव यांनी संयोजनात सहकार्य केले. राज अहेरराव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पी. बी. शिंदे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने समारोप करण्यात आला.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा