घारपी शाळेत वर्षभर नियमित सर्वाधिक दिवस उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान
बांदा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे सन २०२५–२६ या शैक्षणिक वर्षात सर्वाधिक दिवस शाळेत उपस्थित राहून नियमिततेचा आदर्श निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शिक्षणाप्रती निष्ठा, शिस्त आणि सातत्य यांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गावकर, उपाध्यक्षा यशोदा गावडे, पालक उमेश नाईक, अजित असनोडकर, महेश नाईक, अंगणवाडी सेविका संजना गावकर, मदतनीस अमृता कविटकर, आशा सेविका उत्तरा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
सन २०२५–२६ या शैक्षणिक वर्षात नियमित सर्वाधिक दिवस उपस्थित राहिलेल्या भिकाजी उमेश नाईक, रूची महेश नाईक व किर्ती राजेंद्र गावकर या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, भेटवस्तू व टाळ्यांच्या गजरात विशेष सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पालकांच्या डोळ्यातील अभिमानामुळे कार्यक्रमाचे वातावरण भावनिक झाले होते.
यावेळी शिक्षकांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “नियमित उपस्थिती हीच यशाची पहिली पायरी आहे. दररोज शाळेत येणारा विद्यार्थी केवळ अभ्यासातच नव्हे, तर शिस्त, आत्मविश्वास आणि सामाजिक मूल्यांमध्येही पुढे असतो.”
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नियमित शाळेत येण्याची प्रेरणा निर्माण झाली असून शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.
सदरचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी मुख्याध्यापक जे. डी. पाटील तसेच सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे व धर्मराज खंडागळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
