You are currently viewing वजराठमध्ये अपूर्ण कामांच्या भूमिपूजनावरून वाद; महिला लोकप्रतिनिधींचा निषेध

वजराठमध्ये अपूर्ण कामांच्या भूमिपूजनावरून वाद; महिला लोकप्रतिनिधींचा निषेध

वजराठमध्ये अपूर्ण कामांच्या भूमिपूजनावरून वाद; महिला लोकप्रतिनिधींचा निषेध

प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच कार्यक्रम उरकला – सरपंच सौ. अनन्या आनंद पुराणिक यांचा आरोप;

वेंगुर्ला

वेंगुर्ला तालुक्यातील वजराठ गावात जनसुविधा योजनेअंतर्गत मंजूर कामांच्या भूमिपूजनावरून वाद निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीकडून आवश्यक कागदपत्रे, प्रस्ताव, अंदाजपत्रक तसेच तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्रक्रिया सुरू असताना काही स्थानिक पुढाऱ्यांनी घाईघाईत भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सरपंच सौ. अनन्या आनंद पुराणिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात दोन रस्ते व पंचायत समिती शेष निधीतून शाळेच्या छपराचे काम मंजूर झाले आहे. मात्र संबंधित अंदाजपत्रके ग्रामपंचायत कार्यालयात येणे व निविदा प्रक्रिया पूर्ण होणे बाकी असताना कोणत्याही अपूर्ण कामांचे भूमिपूजन होऊ नये, अशी त्यांची भूमिका होती. तरीही काही स्वयंघोषित पुढाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना न जुमानता कार्यक्रम आयोजित करून गुपचूप भूमिपूजन केल्याचा आरोप त्यांनी केला.
या कार्यक्रमाला सहकार क्षेत्रातील अध्यक्ष तसेच सरपंच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी पूर्ण माहिती न घेता केवळ दिखाऊपणासाठी हजेरी लावल्याची टीका सरपंचांनी केली आहे. यामुळे केवळ त्यांचाच नव्हे, तर गावातील तिन्ही महिला लोकप्रतिनिधींचा अपमान झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
गावाच्या विकासासाठी समन्वयाने काम करणाऱ्या महिला प्रतिनिधींना डावलून असे प्रकार घडणे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे अशा घटना घडल्यास संबंधित मान्यवर व स्थानिक पुढाऱ्यांविरुद्ध योग्य निर्णय घेतले जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा