*आला उन्हाळा… तब्येत सांभाळा!”*
*उष्णतेच्या लाटेत घारपी शाळेत आरोग्य जनजागृती; विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त सहभाग*
*बांदा*
सध्या सर्वत्र उष्णतेची तीव्र लाट सुरू असून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारपी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रभावी आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात डॉ. व्ही. जी. माणगावकर व डॉ. पारधी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उष्माघातापासून बचावाचे उपाय, भरपूर स्वच्छ पाणी पिण्याचे महत्त्व, हलका व पौष्टिक आहार, तसेच कडक उन्हात बाहेर पडताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थ्यांना डोक्यावर टोपी किंवा रुमाल वापरणे, दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळणे आणि शरीरातील पाण्याची पातळी कायम राखणे याबाबतही सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारले आणि डॉक्टरांनी त्यांचे समर्पक निरसन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक जे. डी. पाटील तसेच सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा यशोदा गावडे अंगणवाडी सेविका संजना गावकर, मदतनीस अमृता कविटकर, संचिता सावंत आणि आशा सेविका उत्तरा नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.
विशेष म्हणजे, या उपक्रमास ग्रामस्थांचीही लक्षणीय उपस्थिती लाभली, ज्यामुळे आरोग्य जनजागृतीचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचला.
उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेत विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
