You are currently viewing मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजनेच्या समितीवर महेश संसारे यांची निवड

मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजनेच्या समितीवर महेश संसारे यांची निवड

मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजनेच्या समितीवर महेश संसारे यांची निवड

प्रगतशील शेतकऱ्याला संधी; ग्रामीण पायाभूत सुविधांना चालना मिळण्याची अपेक्षा

वैभववाडी

मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजना अंतर्गत कणकवली विधानसभा क्षेत्रस्तर समितीवर प्रगतशील शेतकरी महेश संसारे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे स्थानिक शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी नुकतीच क्षेत्रस्तर समिती गठीत करण्यात आली असून, या समितीच्या अध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर वैभववाडी तालुक्यातील मांगवली गावचे सुपुत्र महेश संसारे यांना समितीवर संधी देण्यात आल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

महेश संसारे हे प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करत उत्पादनात वाढ साधली असून, शेती क्षेत्रात त्यांनी केलेली प्रगती उल्लेखनीय मानली जाते. त्यांच्या कार्यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली आहे.

मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजनेच्या माध्यमातून शेत पानंद रस्त्यांचा विकास करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी सुलभ आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे, तसेच ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. संसारे यांच्या निवडीमुळे या योजनेच्या अंमलबजावणीला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिक, शेतकरी व विविध सामाजिक घटकांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले असून, त्यांच्या अनुभवाचा लाभ संपूर्ण कणकवली विधानसभा क्षेत्राला होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, महेश संसारे यांनी आपल्या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांच्यात योग्य समन्वय साधल्यास ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळू शकते. शेती क्षेत्रात अनेक अडचणी असल्या तरी परस्पर सहकार्य आणि आधुनिक दृष्टिकोन यामुळे आर्थिक प्रगती साध्य होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा