“महिला अत्याचारांवर मौन, आता आरक्षणावर भूमिका?”
साक्षी वंजारींचा भाजपा महिला जिल्हाध्यक्षांना सवाल
संवाद आणि जबाबदारीची मागणी
सिंधुदुर्ग :
महिला आरक्षण, डिलिमिटेशन (परिसीमन) आणि राज्यातील वाढत्या महिला व बाल अत्याचारांच्या मुद्द्यांवरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, सिंधुदुर्ग महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांनी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कौरगावकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
प्रेस नोटद्वारे वंजारी यांनी म्हटले आहे की, आतापर्यंत महिला व बाल अत्याचारांसारख्या गंभीर विषयांवर एकही भूमिका न घेणाऱ्या भाजपा महिला जिल्हाध्यक्ष अचानक आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलू लागल्या, ही बाब लक्षवेधी आहे. मात्र, इतक्या काळ त्यांनी इतर सामाजिक व कायदेशीर प्रश्नांवर मौन का बाळगले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघांची पुनर्रचना असून, हा विषय सर्वसामान्यांसाठी गुंतागुंतीचा वाटू शकतो. या पार्श्वभूमीवर खुल्या चर्चेचे आयोजन करावे, जेणेकरून जनतेलाही या विषयाची सखोल माहिती मिळेल, अशी मागणी वंजारी यांनी केली. लोकशाहीत संवाद हा परस्पर असावा, एकतर्फी नसावा, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, शिंदे सेनेचे केसरकर समर्थकांनी दिलेले प्रत्युत्तर हे अपरिपक्व आणि विषयाच्या अज्ञानातून दिलेले असल्याची टीकाही वंजारी यांनी केली. नाशिक येथील भोंदू बाबा प्रकरणात आमदाराचे नाव समोर येणे ही गंभीर बाब असून, अशावेळी विरोधी पक्षाने प्रश्न उपस्थित करणे हे त्यांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, हिंसक आंदोलन व पुतळे जाळणे ही सिंधुदुर्गची संस्कृती नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
तसेच, संबंधित आमदारांनी निष्पक्ष चौकशीला सामोरे जावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी आपल्या वक्तव्यांमधून इतर आमदारांचाही उल्लेख केल्याची बाब जनतेच्या लक्षात राहील, असेही वंजारी म्हणाल्या.
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर केवळ राजकारण न करता, विधेयकातील त्रुटी समजून घेणे आवश्यक आहे. या विषयावर ठोस भूमिका घेणाऱ्या विरोधी पक्षाचे महिलांनी स्वागत करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
— सौ. साक्षी वंजारी
अध्यक्ष, सिंधुदुर्ग महिला काँग्रेस कमिटी.
