You are currently viewing सिंधुदुर्गात मंदिरांमध्ये पुन्हा घंटानाद

सिंधुदुर्गात मंदिरांमध्ये पुन्हा घंटानाद

सिंधुदुर्गात मंदिरांमध्ये पुन्हा घंटानाद; महासंघाच्या उपक्रमांना प्रतिसाद

मतभेद दूर करून मानकरी एकत्र; जिल्ह्यातील अनेक देवस्थानांत पुन्हा धार्मिक कार्यक्रम सुरू

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अंतर्गत मतभेद, समन्वयाचा अभाव आणि मार्गदर्शनाच्या कमतरतेमुळे वर्षानुवर्षे बंद असलेली देवी-देवतांची मंदिरे आता पुन्हा सुरू होऊ लागली आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुढाकारामुळे या मंदिरांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, गावागावांत पुन्हा घंटानाद घुमू लागल्याची माहिती महासंघाचे संजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्गनगरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम, मंदिर महासंघाचे शरद राऊळ, यशवंत परब, हिंदू जनजागृती समितीचे राजेंद्र पाटील, तसेच विविध गावांतील मानकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
महासंघाच्या वतीने राबवण्यात आलेल्या नामसत्संग, माणगाव येथे आयोजित जिल्हा मंदिर परिषद आणि प्रत्यक्ष संवाद या त्रिसूत्री उपक्रमांमुळे विखुरलेले मानकरी एकत्र येत आहेत. अनेक गावांमध्ये मानपानाच्या वादातून बंद पडलेली धार्मिक कार्यक्रमांची परंपरा पुन्हा सुरू होत असून, गावातील एकोप्याला नवे बळ मिळत आहे.
जिल्ह्यातील घारपी उडेली, माडखोल येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिर, कुडाळ तालुक्यातील पडवे येथील देव रवळनाथ मंदिर, कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील लिंग माऊली मंदिर, दोडामार्ग तालुक्यातील उगाडे येथील ग्रामदैवत मंदिर तसेच मालवण तालुक्यातील नांदरुख येथील श्री देव गिरोबा मंदिर यांसारखी अनेक मंदिरे मानकरी व ग्रामस्थांच्या सहकार्याने पुन्हा सुरू करण्यात आली आहेत.
अद्यापही जिल्ह्यात सुमारे २५ हून अधिक मंदिरे अंतर्गत वादांमुळे बंद असल्याची माहिती देत, या गावांना भेटी देऊन मतभेद दूर करण्यासाठी तसेच धर्मशास्त्रानुसार मार्गदर्शन करण्यासाठी महासंघ प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी उपस्थित मानकऱ्यांनी महासंघाचे आभार मानत, त्यांच्या पुढाकारामुळे अनेक वर्षांपासून दुरावलेले मानकरी एकत्र आले असून, आता धार्मिक कार्यक्रम एकोप्याने पार पडत असल्याने गावांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा