*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*अक्षय तृतीया*
अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. ..
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो.
पौराणिक मान्यतेनुसार अक्षय
तृतीयेच्या दिवशी त्रेतायुगाचा आरंभ झाला होता… या दिवशी प्रभू विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे.. या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते.. खानदेशात आखाजी म्हणून हा सण ओळखला जातो.. ह्या दिवशी अन्नपूर्णा (देवी) जयंती, नर-नारायण जयंती, परशुराम जयंती- (प्रभू विष्णूंच्या सहावा अवतार परशुराम यांचा जन्मदिवस), बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंती असते. महर्षी व्यासांनी गणपतीस लेखनिक म्हणून घेऊन याच दिवशी महाकाव्य महाभारत लिखाणास प्रारंभ केला..
दक्षिण भारतात महाविष्णु आणि लक्ष्मी व कुबेर पूजन यांचे महत्त्व या दिवशी असते… पश्चिम बंगालमध्ये व्यापारी वर्गात अक्षय्य तृतीया हा महत्त्वाचा दिवस मानला जातो व हालकटा या नावाने या दिवशी गणपतीची व लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते..
वैशाख महिना हा मराठी महिन्यांतील दुसरा महिना. या वेळी सूर्याची प्रखरता तीव्रतेने जाणवते. त्याचा परिणाम सभोवतालच्या सृष्टीवर पडलेला दिसतो म्हणून या महिन्याला वैशाख वानवा असंही म्हणतात. त्यामुळे थंड पाणी पिणे, थंड पाण्याने अंघोळ करणे आल्हाददायक वाटते.
या महिन्यात महत्वाचे सण व उत्सव येतात. त्यात अक्षय तृतीया हा मोठा सण येतो…
हिंदू संस्कृतीचा जर आपण विचार केला तर आपल्या डोळ्यांसमोर विविध सणांची सुरेल अशी गुंफण दिसते. त्यातील सर्वात महत्वाचा मेरूमणी म्हणजे अक्षय तृतीया..
चैत्रातील पानफुटी व जेष्ठातील पानगळ यांचा एकत्रित धागा गुंफणारा असा हा सण.. अक्षय म्हणजे अखंड कायम स्वरूपी आनंद देणारं,आपल्या प्रत्येकाच्या सुखनैव आयुष्याला फुलविण्याचे काम करतो..
हिंदू नववर्षाच्या सुरूवातीला मांगल्य, नवचैतन्य फुलवत, दिमाखात, डौलात
नवीन आशा-आकांक्षा पल्लवीत करणारा हा सण..
जीवन हे क्षणभंगुर आणि अशाश्वत आहे. हे जरी खरं असलं तरी त्यापासून मिळणारं सुख शाश्वत असावं या ध्यासापायीच त्याची निर्मिती केली गेली आहे. आपल्याला जीवन जगण्यासाठी जी उर्मी, उभारी प्राप्त होत असते त्यामध्ये अनेकांचा हातभार, वाटा असतो व त्या सर्वांना त्याचं त्याचं श्रेय देणं व कृतज्ञतापूर्वक त्यांच स्मरण करण्याचा उत्सव म्हणजे अक्षय तृतीया.. या दिवशी पुण्यकृत्य करावं असे आपले धर्मशास्त्र सांगते..
धामधुमीचं आयुष्य खर्च झाल्यावर (खर्चल्यावर) आपल्या हाती सुखाचा सोहळा घडवून आणण्याखेरीज दुसरं राहतं तरी काय ?… तुकोबा म्हणतात
!! याजसाठी केला होता अट्टाहास !
शेवटचा दिवस गोड व्हावा !!.. तुकाराम महाराजांना ही आपले जीवन क्षणभंगुर आहे हे माहीत होते म्हणून त्यांनी आपल्या जीवनात सद्गुरू सुखाचा आनंद स्वतःहा तर लुटलाच व इतरांनाही तो लुटण्यास प्रवृत्त केले..
शाश्वत सुखाची अर्थात ईशकृपेची त्यांची कामना होती आणि तोच त्यांचा अट्टाहासही होता.. तसेच आपले महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व व ख्यातनाम साहित्यिक पु.ल. देशपांडे यांनी सुद्धा शाश्वत सुखाचा दाखला देताना म्हटले आहे की ” हे जग मी सुंदर करुन जाईन”… !!
केलेल्या उपकारांच स्मरण ठेवणं,
भ्रामक गोष्टींच्या मायाजालात गुंतून न राहता चिरंतन गोष्टींचा ध्यास घेणं, शाश्वत आनंद लुटणं, आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेणं हे तर ख-या अर्थाने शाश्वत सुख आहे.. हे शाश्वत आहे म्हणून ते अक्षय ही आहे…
तुम्हा-आम्हां सर्वांनाच त्याची ओढ लागावी हे अक्षय तृतीयेचे खरे “मर्म ” आहे.. ज्याला हे मर्म समजेल त्याला शाश्वत सुखाचाही मार्ग सापडेल व आपल्या सुखसौख्याचे ” अक्षय ” असे धनही गवसेल.. आता तरी कळले का?… अक्षय तृतीयेचे खरे मर्म…
वैशाखातली अक्षय्य तृतीया दान संस्कृतीचं माहात्म्यही पटवून देते. वैशाखातल्या उन्हाळ्यात तर जलदानाचीही आवश्यकता असते नाही का… !!
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी– ठाणे@
9870451020
