You are currently viewing ही धुंदी जगावेगळी

ही धुंदी जगावेगळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन – रायबागकर यांनी कारगिल विजय दिवस निमीत्त लिहिलेला अप्रतिम लेख*

*ही धुंदी जगावेगळी*

आज दिवसभराच्या बातम्या कानात गुंजताहेत…पुन्हा पुन्हा स्मरण होतंय त्या युद्धाचं, शहिदांचं आणि विजयाचंही…ऐकुन अभिमानाने उर भरून येतोय…कारण…मी प्रत्यक्ष साक्षीदार होतो त्या दैदिप्यमान विजयाचा…आणि शिल्पकारही…अंगावरच्या या जखमांचे अलंकार फक्त आजच्या दिवशीच नाही तर रोजच मला आठवण करून देतात त्या दिवसाची…पण आज मात्र जास्त तीव्रतेने होते हे नक्की…

अशीच होती तीही कातरवेळ…२६ जुलै १९९९ची…गेल्या दोन महिन्यांपासून आशा निराशेच्या झुल्यावर झुलत होतं मन…ती धुमश्चक्री, कधी सरशीचे उंच शिखर तर कधी निराशेच्या गर्तेची खोल दरी…कधी शत्रूला कंठस्नान तर कधी शहिदांचे गमावलेले अनमोल प्राण…कधी पराभवाची हताशा तर कधी विजयाचा जल्लोष…

आणि अखेर आली अंतिम विजयाची बातमी…कारगिल वर मिळवलेल्या दणदणीत विजयाची…अखेर आम्ही जिंकलो…जिंकणारच होतो…पण त्यासाठी किती जवानांच्या प्राणांचे द्यावे लागले मोल…नाहकच…हसत हसत शत्रूच्या गोळ्या झेलल्या त्यांनी छातीवर…कितीक जायबंदी झालेत… मातृभूमीच्या रक्षणाच्या धुंदीची नशा चढली होती आमच्या तनामनावर…गारुड केलं होतं जणू देशभक्तीने…

जिंकु किंवा मरू
माणुसकीच्या शत्रुसंगे
युद्ध आमचे सुरू

ही एकच आस उरात…

ती उंचच उंच शिखरं, हाड गोठवणारी थंडी, अपुरा प्राणवायू, अपूरं अन्न, कश्शा कश्शाची तमा नव्हती आम्हाला…सर्वांचं एकच लक्ष्य…जिंकायचं आणि जिंकायचंच…बस्स्…आणि आम्ही…छे…आपण जिंकलो…आणि मग त्या संध्याकाळची धुंदी काही औरच होती…ती धुंदी होती विजयाची…शत्रूला पाणी पाजल्याची…चारी मुंड्या चित् केल्याची…अंधारात काळेकभिन्न दिसणारे ते पहाड आज भेडसावत नव्हते आम्हाला…त्या थंडीतही आमच्या विजयाची ऊब जाणवत होती…त्या सांजवेळी आमच्या विजयाचा दीपक प्रकाशमान झाला होता…

अर्थात आपले सहकारी गमावल्याच्या दुःखाची काळी किनार होतीच त्याला…पण ते गृहीत धरूनच तर आम्ही देशरक्षणासाठी बाहेर पडतो घराच्या…डोळ्यांसमोर एकच ध्येय असतं आमच्या…डोळ्यात तेल घालून मातृभूमीचे रक्षण करतांना, विजयाचा तिरंगा फडकवतांना तिरंग्यातच लपेटून घरी परतावं लागलं तरी बेहत्तर…युद्धाच्या वेळी त्या ध्येयाला धुंदीचा गहिरा केसरिया रंग चढतो…स्फुल्लिंग चेतवल्या जातं…ते युद्ध लादलेले असतं तरीही…

घरच्या, प्रियजनांच्या आठवणी मनाच्या कप्प्यात खोल खोल दडवल्या जातात तेवढा काळ…ठाऊक असतं ते आहेतच आपल्याबरोबर…आणि त्यांच्याबरोबरच सारे देशबांधवही…तो विश्वास हृदयाशी बाळगूनच आम्ही सज्ज होतो शत्रुशी दोन हात करायला…

ह्या अशा जगावेगळ्या धुंदीत गुरफटून जायला भाग्यच लागतं…त्या रणभूमीवर आमची बंदूक म्हणजे आमची त्यावेळची प्रियतमा असते…जिवाभावाची सखी…
क्षणभरही विसंबत नाही आम्ही तिला…आणि तीही आम्हाला बिलगुन बसते घट्ट…आणि ती कधीही धोका देणार नाही असा विश्वास असतो मनात…आहोत ना आम्ही भाग्यवान…

नको बागबगीचा
नको समुद्रकिनारा
प्रीतीच्या धुंदीपरि
मज देश आपला प्यारा

अशी आगळी नशा ही
भिनलेली सांजवेळी
लाभावी मज सतत
ही धुंदी जगावेगळी

जयहिंद!

भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
9763204334
२६-७-२२

प्रतिक्रिया व्यक्त करा