You are currently viewing खरा तो एकची धर्म आणि आचरे गावची संस्कृती

खरा तो एकची धर्म आणि आचरे गावची संस्कृती

 

आचरे पिरावाडी येथे संपन्न होणाऱ्या हनुमान जयंती शताब्दी सोहळ्याचा भव्य बोर्ड आचरे तिठा येथे लागलेला.! बोर्ड एवढाच कार्यक्रम तीन दिवसांचा भरगच्च.! माझे सांगली येथून रामनवमीला आलेले अमित नाईक पत्रकार मित्र तो बोर्ड वाचताता. . ‘खरच तुमच आचरा ग्रेट आहे.. मानल’ हे त्यांचे ऊद्गार.. मी म्हणालो आचरा ग्रेट आहेच पण आचरेची प्रत्येक वाडी ग्रेट.. ! मी आचरे पिरावाडीचा सांस्कृतिक लौकिक त्यांना सांगितला.. ते म्हणाले .. मी कार्यक्रमाच्या भव्यतेवर ग्रेट नाही म्हणालो.. कार्यक्रमाच्या शेवटची ओळ मला भावली, एवढ्या भव्य कार्यक्रमाला हनुमान जयंती शताब्दीला पिरावाडी ग्रामस्थांसोबत विशेष आर्थिक सहाय्य अशीब मुजावर आणि बशीर मुजावर हे मुस्लिम बांधव असावेत. ही बोर्डाची शेवटची ओळ मला भावली. यावरुन या गावात सर्व धर्म समभाव जगला जातो केवळ जपला जात नाही. अमित नाईक यांच्या उद्गाराने माझी छाती एक आचरेकर म्हणून भरुन आली. मी म्हणालो आमच्या संस्थान आचरे गावची ही संस्कृती प्रत्येक धर्मियांकडून जपली जाते. चारही धर्मांचे लोक गुण्यागोंदाने रहातात माझ्या गावात आणि *मजहब नही सिखाता आपसमे बैर रखना* हे जगतात. माझ्या ७० वर्षाच्या आयुष्यात कायम आचरेत गावात राहून धार्मिक वादातून तंटा झालेला मी बघितलेला नाही. म्हणूनच माझा रामेश्वर डाळपस्वारीला तीन वर्षातून एकदा गाव फेरीला निघतो,, रामेश्वराची स्वारी रयते सोबत जामडुल ला जाते, त्यावेळी जरोन फर्नांडीस, मोतेस फर्नांडीस आणि त्यांचे कुटुंबिय जवळ जवळ दहा पंधरा हजार हिंदू भाविकांना आपल्या घरी सुग्रास आणि मिष्टान्न भोजनाचा लाभ देतात. त्या भोजनाची चव आणि आणि जारोनचे नियोजन यांच्या चर्चा पुढील तीन वर्षे आचरेत चवीने चघळल्या जातात. पूर्वी रामनवमीला पालखीला वाजणारा कासिमभाईंचा तासा.. ईबाची ढोलकी.. प्रत्येक नाटकात प्राॕम्टर म्हणून पडद्यावर मागे असलेले आदमभाई ..हे पाहीलेली.. माझी पिढी.. आयाज शेख नेही शेवट पर्यंत ही परंपरा जपली.. अजूनही नाताळ असो.. ईद चा शिरकुर्मा असो.. बुद्धपोर्णिमेचा प्रसाद असूदे , चतुर्थीचे मोदक असूदे .. नाहीतर दिवाळीचा फराळ.. अगदी आपल्या सर्वधर्म मित्रमंडळीना खिलविण्यात जातीवंत आचरेकरांच्या मनात हुरूप असतो..मग तो जरोन फर्नांडीस असो वा जुबेर काझी असो सर्वजणच रामेश्वराला आपल्या दैवतांएवढेच जवळचे मानतात. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या रामेश्वर वाचनालयाचे पहिले देणगीदार शहाबुद्दीन काझी तर शतोकोत्तरी रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या आचरे हायस्कूल च्या प्रारंभीच्या देणगीदारात काझी बंधू सापडतील.. माझ्या निवेदनाने ते थक्क झाले.. शेवटी मी त्त्यांना अभिमानाने म्हणालो *जे जे ऊत्तम ऊदात्त ऊन्नत तेते तुम्ही आचरा..म्हणून लोकाना संदेश देते ते माझे आचरा गाव. संस्थान आचरे. ..अमितने त्या बोर्डालाच नमस्कार केला..*तो नमस्कार केवळ बोर्डाला नसून माझ्या आचरे गावच्या संस्कृतीला होता.*

सुरेश ठाकूर. (ठाकूर गुरुजी.. आचरे पारवाडी.. ९४२१२६३६६५ )

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =