रात्री सुरू असलेल्या कामांमुळे वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त
“तात्काळ कारवाई करा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील” – परब यांचा इशारा
सावंतवाडी :
शहरात सुरू असलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल)च्या कामांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
सायंकाळनंतरही काम सुरू ठेवल्यामुळे शहरात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या परब यांनी थेट घटनास्थळी जाऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनाही फोन करून “रात्री काम करण्याची परवानगी दिली का?” असा सवाल उपस्थित केला.
रहदारीच्या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कामाच्या ठिकाणी उडणाऱ्या धुळीमुळे लोकांचे आरोग्यही धोक्यात येत असून रस्त्यावर रोलर फिरवले जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
यावेळी परब यांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना ‘सेना स्टाईल’ दाखवत तात्काळ काम सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. अन्यथा शांत असलेल्या सावंतवाडीकरांचा अंत पाहू नका, असा इशाराही त्यांनी दिला.
या प्रसंगी शिवसेनेचे सत्यवान बांदेकर व श्री. सावंत आदी उपस्थित होते.
