You are currently viewing महावितरणच्या अकार्यक्षम कारभारावर वीज ग्राहकांचा सूर एकवटला!

महावितरणच्या अकार्यक्षम कारभारावर वीज ग्राहकांचा सूर एकवटला!

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; कुडाळ येथे जिल्ह्याभरातील वीज ग्राहकांचा अधीक्षक अभियंत्यांपुढे आक्रोश

 

कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने महावितरणच्या अकार्यक्षम व अंधाधुंद कारभाराला कंटाळलेल्या वीज ग्राहक, व्यापारी आणि सरपंच संघटनेच्या सदस्यांनी कुडाळ येथे मोठ्या संख्येने हजेरी लावत अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. ही बैठक कुडाळ येथील महावितरण कार्यालयातील प्रशिक्षण हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या वीज ग्राहकांनी तालुकावार आपापल्या समस्या स्पष्ट शब्दांत मांडल्या आणि तात्काळ लेखी उत्तरांची मागणी केली. रोषाने भरलेल्या या चर्चेत महावितरणचे अधिकारी काहीसे निरुत्तर झाल्याचे चित्र निर्माण झाले होते.

बैठकीच्या प्रारंभी जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड, जिल्हा सचिव दीपक पटेकर, समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, राजेश राजाध्यक्ष, ह्युमन राईट्स कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष नाईक, उपाध्यक्ष बाळ बोर्डेकर, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष सुनील भोगटे, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संजय गावडे, सचिव जयराम वायंगणकर, कणकवली तालुकाध्यक्ष गुरुनाथ (दादा) कुलकर्णी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुभाष दळवी, सचिव भूषण सावंत, कुडाळचे गोविंद सावंत, माजी पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस आदी मान्यवर उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या डोंगरी भागातून महावितरणच्या मुख्य वाहिन्या जात असल्याने पावसाळ्यात झाडे पडून वीज खंडित होण्याचे प्रकार सातत्याने घडतात. यासाठी महावितरणला आधीच ३३ प्राधान्य कामांची यादी देऊन सतर्क करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कामे न होता केवळ कागदोपत्रीच कार्यवाही दाखवली गेल्याचा आरोप संघटनेने केला. अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी पावसाळ्याची लवकर सुरुवात झाल्यामुळे काही कामे अपूर्ण राहिल्याची कबुली दिली आणि उघडीप मिळताच झाडांची छाटणी करण्यात येईल अशी ग्वाही दिली. यामुळे चर्चेला काहीशी सकारात्मक वळण मिळाले.

तालुकावार समस्यांची यादी रोखठोक मांडली गेली. संतोष नाईक, प्रणय बांदिवडेकर, गुरुनाथ कुलकर्णी यांनी वैभववाडी व कणकवलीतील प्रश्न उपस्थित केले; नंदन वेंगुर्लेकर यांनी देवगड, मालवणच्या समस्या मांडल्या; महेश खानोलकर, नारायण (बाळा) जाधव यांनी सावंतवाडीतील प्रश्न उभे केले. सावंतवाडीत वारंवार होणाऱ्या वीज खंडित पुरवठ्यामुळे राजू पनवेलकर यांनी रोष व्यक्त केला.

गोविंद सावंत यांनी झाडे न छाटल्याने कुडाळमध्ये दिवसभर वीज गायब असल्याची तक्रार केली. पिंगळी सरपंच आकेरकर, पावशी सरपंच वैशाली पावसकर, विकास माणगावकर, उदय माणगावकर यांच्यासह अनेकांनी गावपातळीवरील समस्यांची ठळक मांडणी केली. शिवापूर येथून तब्बल ६० किमी अंतर पार करून आलेल्या सरपंच सुनिता शेडगे यांनी विजेविना १५/१५ दिवसांचा अंधार मांडत पुढील बुधवारी अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक ठरवली आहे.

राजन परब यांनी सरपंच संघटनेतर्फे जिल्हाभरातील तक्रारींचा पाढा वाचून दाखवला. साईनाथ आंबेरकर यांनी कसाल, ओरोस येथील प्रश्न मांडले, तर संजय गावडे यांनी वेंगुर्ल्यातील अभियंत्यांची मागणी व अखंडित वीज पुरवठ्याचे प्रश्न समोर ठेवले.

दोडामार्ग तालुक्याच्या समस्या सुभाष दळवी, भूषण सावंत, संजय गवस, गोपाळ गवस यांनी खोलवर मांडल्या. मोडकळीस आलेले वीज खांब, जंगलातून जाणाऱ्या वाहिन्या, सबस्टेशनच्या जागेची अडचण, वीज अपघातातील पीडित कुटुंबाला आर्थिक मदत यांचा समावेश होता.

ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी संयम आणि ठामपणे महत्त्वाचे मुद्दे कणकवलीचे कार्य. अभियंता माळी, कुडाळचे कार्य. अभियंता वनमोरे आणि अधीक्षक अभियंता यांच्यासमोर मांडले. जिल्हा सचिव दीपक पटेकर यांनी अधीक्षक अभियंत्यांकडून सकारात्मक पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्ष संजय लाड यांनी जिल्ह्यातील वीज समस्या गंभीर असून अधिकाऱ्यांनी याचा सारासार विचार करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली.

या बैठकीस शिवराम आरोलकर, गोविंद कुडाळकर, शेखर गावडे, नारायण गोसावी, भक्ती घाडीगावकर, किरण खानोलकर, वाल्मिकी कुबल, संजय तांडेल, अजय नाईक, अनंत आसोलकर, परशुराम परब, विनायक गाडगीळ, मायकल लोबो, अनिल शेटकर यांच्यासह वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरळीत बैठक पार पाडण्यासाठी कुडाळ पीएसआय भांड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त सांभाळला.

प्रतिक्रिया व्यक्त करा