नेपाळमध्ये मालवणच्या दुर्वाचा सुवर्ण विजय!
१७ व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदकावर नाव कोरले
मालवण | प्रतिनिधी :
मालवण तालुक्यातील सुकळवाड गावची सुकन्या तथा आंबोली सैनिक स्कूलची विद्यार्थिनी कु. दुर्वा निलेश बांदेकर हिने नेपाळमधील काठमांडू येथे पार पडलेल्या १७ व्या NSKA आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत मालवण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
काठमांडू येथे नुकत्याच झालेल्या या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दुर्वाने भारताचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी केली. आपल्या दमदार खेळाच्या जोरावर तिने सुवर्णपदकावर नाव कोरले आणि देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवला.
कु. दुर्वा बांदेकर ही आंबोली येथील सैनिक स्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिक्षण घेत आहे. सुकळवाड बाजारपेठ येथील निलेश बांदेकर व सौ. नूतन बांदेकर यांची ती कन्या आहे. अल्पवयातच आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या या यशामुळे तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दुर्वाच्या या नेत्रदीपक यशामुळे सुकळवाड गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सुकळवाड पंचक्रोशीसह मालवण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
