नद्यांमधील गाळ काढल्याने पाणी वहन क्षमतेत वाढ
· मागील वर्षी 4 लाख 63 हजार तर यावर्षी मार्च पर्यंत 3 लाख घनमीटर गाळ काढला
सिंधुदुर्गनगरी
जलसंपदा विभागाकडे ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व महसूल विभागाकडून प्राप्त निवेदनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील तिलारी, तेरेखोल, वेंगुर्ला, कर्ली, देवगड, वाघोटन, आचरा, गड व महादयी या उपखोऱ्यांतील नद्यांमधील गाळ काढण्याची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.
मागील वर्षी जून २०२५ पर्यंत यांत्रिकी विभाग, नाम फाउंडेशन व मागणीदार अभिकरणांच्या माध्यमातून एकूण १४,८०,१४० घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी यांत्रिकी विभागामार्फत ३,३९,६९४ घ.मी., नाम फाउंडेशनमार्फत १,११,७९७ घ.मी. आणि मागणीदार अभिकरणांकडून १२,४७५ घ.मी. असा एकूण ४,६३,९६६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.
नद्यांमधील गाळ काढल्यामुळे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढली असून, पावसाळ्यात पाणी पात्राबाहेर जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी शेतजमिनी व गावांमध्ये पाणी शिरण्याच्या घटनांमध्ये घट झाली असून, नदीकाठच्या गावांना बसणारा पुराचा फटका कमी झाला आहे. तसेच पाणी साचण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.
सन २०२६ साठीही लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सहभागातून क्षेत्रीय पाहणी करून कामांची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार जून २०२६ पर्यंत ६,११,६८८ घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन असून मार्च २०२६ अखेरपर्यंत यांत्रिकी विभागामार्फत ५६,७४३ घ.मी. व नाम फाउंडेशनमार्फत २,४९,१८८ घ.मी. असा एकूण ३,०५,९३१ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.
