You are currently viewing विनोद अष्टुळ यांना कवी संजीव प्रेरणा पुरस्कार

विनोद अष्टुळ यांना कवी संजीव प्रेरणा पुरस्कार

 

विनोद अष्टुळ हे सहकार, अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मानाची पदे भूषवित असताना साहित्यिक क्षेत्रात त्यांनी चौदा वर्षात सातत्याने दोनशे आठरा कवी संमेलने तसेच एक दिवशीय अनेक साहित्य संमेलन घेतली आहे. त्यांनी साहित्यसम्राट पुणे या संस्थेमार्फत मोफत पुस्तक पेढी, कवींचे वाढदिवस, साहित्यिक सहपरिवार श्रावण सहल, शब्द गोड दिवाळी, वारीतील संमेलने, वर्धापन दिन, साहित्य सन्मान पुरस्कार, अशा अनेक प्रसिद्ध उपक्रमांद्वारे कवी कवियत्रींना घडवण्याचे तसेच भाषा संवर्धनाचे कार्य सभागृहांपासून स्मशानभूमीपर्यंत जाऊन साहित्य सेवेसाठी केले आहे. त्यांना अनेक नामांकित पुरस्कार सुद्धा प्राप्त आहेत.

आभाळ फाटले की कथा तयार होते, जमीन फाटली की कादंबरी तयार होते आणि काळीज फाटले की कविता तयार होते. असे माणसांच्या काळजापर्यंत पोहोचणारे सुप्रसिद्ध अजरामर चित्रकार, छायाचित्रकार, शिल्पकार, गीतकार, पटकथा लेखक असणारे कवी संजीव यांच्या जयंती निमित्ताने यावर्षीचा कवी संजीव प्रेरणा पुरस्कार २०२६ अखंडपणे साहित्य चळवळ निस्वार्थपणे पुढे घेऊन जात असलेले कवी विनोद अष्टुळ यांना अधिक प्रेरणा देणारा आहे. याचा मला मनस्वी आनंद आहे. असे अध्यक्षीय भाषणात ग्रामीण कथाकार बबन पोतदार यांनी विचार व्यक्त केले.

कै.कृष्ण गंगाधर दीक्षित उर्फ कवी संजीव यांच्या स्मृतिपित्यर्थ जयंतीनिमित्त कवी संजीव प्रतिष्ठान पुणे यांनी स्काऊट ग्राउंड सदाशिव पेठ पुणे येथे आयोजित केलेल्या निमंत्रित कवी संमेलनामध्ये कवी विनोद अष्टुळ आणि अर्चना अष्टुळ यांना सपत्नीक कवी संजीव प्रेरणा पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला.

व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक मा.बबन पोतदार, कवी संजीव प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.सुभाष दीक्षित, मा.गजानन पंडित, मुख्य संयोजक मा.संजय वेदपाठक आणि साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष तसेच पुरस्कारर्थी विनोद अष्टुळ उपस्थित होते.

ज्या ज्या साहित्यिकांनी आपली भाषा, कला समृद्ध करण्यासाठी आयुष्यभर अनेक अडचणींना तोंड देऊन अहोरात्र कष्ट घेतले. भावी पिढ्यांच्या जीवनात आपल्या लेखनांद्वारे आनंद निर्माण केला. तेच साहित्यिक आज दुर्लक्षित आहेत. याचं कारण म्हणजे आजचे लेखक कवी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. म्हणूनच महान कवी संजीव सुद्धा आजपर्यंत दुर्लक्षित राहिले आहेत. त्यांचे स्मारक झाले तर त्यांचा आदर्श आणि प्रेरणा साहित्यिक कलावंतांना कायमस्वरूपी मिळत राहील. असे मत पुरस्काराला उत्तर देताना विनोद अष्टुळ यांनी व्यक्त केली

या निमंत्रितांच्या कवीसंमेलनामध्ये आई, बाई, बायको, मेहुणी, निसर्ग, देशभक्ती, अभंग, लावणी, देव, बाबासाहेब, अंधश्रद्धा, भोंदूगिरी, राजकारण अशा अनेक वास्तववादी विषयांवर दिग्गज सत्तर कवीं कवयित्री यांनी आपल्या बहारदार रचना सादर केल्या. यावर्षी संजीव प्रतिष्ठानच्या प्रथेप्रमाणे भाग्यवान कवयित्री साक्षी नेटके यांना सन्मानचिन्ह लाभले. कवी संमेलनामध्ये सहभाग घेतलेले कवी सूर्यकांत नामूगडे, किशोर टिळेकर, जगदीप वनशिव, गजानन उफाडे, अनिल नाटेकर, आत्माराम हारे, चंद्रकांत जोगदंड, गौरव नेवसे, बाबा ठाकूर, बाळकृष्ण अमृतकर, विलास बाबर, संध्या देशपांडे, रेखा दुसाने, योगिता कोठेकर, अर्चना अष्टुळ आणि संयोजक सुभाष दीक्षित, संजय वेदपाठक तसेच अनेक कवी कवयित्री यांनी विनोद अष्टुळ यांचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात प्रास्ताविक संजय वेदपाठक, सूत्रसंचालन मकरंद दीक्षित यांनी तर कवी संमेलनाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन विनोद अष्टुळ आणि कार्यक्रमाचे आभार योगेश हरणे यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा