You are currently viewing शंभर वर्षांची “अभिषेक”ची परंपरा जोपासणारे; डेगवे-आंबेखणवाडी ग्रामस्थ…

शंभर वर्षांची “अभिषेक”ची परंपरा जोपासणारे; डेगवे-आंबेखणवाडी ग्रामस्थ…

प्रति वर्षी श्रावण महिना सुरु होताच डेगवे, आंबेखणवाडीतील ग्रामस्थ, व महिला ” सोमवार” चा ‘उपवास’ करतात. सदर उपवास श्रावण महिन्यात येणारे सलग सोमवार व त्याला जोडून भाद्रपदात “गणेश चतुर्थी” पर्यंत येणारे २ सोमवार असे मिळून एकूण ७ सोमवार प्रतिवर्षी ‘उपवास’ धरतात. व ७ व्या सोमवारी न चुकता आपल्या “ग्रामदेवतावर” कित्येक वर्षे “अभिषेक” ( एकादशी )करतात. नंतर ते “तिर्थ-प्रसाद”घेऊन दुसऱ्या दिवसापासून ग्रामस्थ”मांसाहार” करण्यास प्रारंभ करतात. हि परंपरा या वाडीत गेल्या “शंभर” वर्षापासून सुरु आहे. सदर ७ वा सोमवार, दि.७ सप्टेंबर २०२० रोजी आहे. त्यामुळे सदर वंशपरंपरेचा आढावा घेणारा “विशेष लेख” आहे…!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात छोटासा “डेगवे” गांव. या गावाच्या दक्षिणेकडे, डोंगराच्या पायथ्याशी दिड, दोन कि.मि.अंतराच्या परीसरात वसलेली लहानशी वाडी म्हणजे “आंबेखण वाडी” होय. सद्या जेम तेम ६०० लोकसंख्या असलेली छोटीशी वाडी. या वाडीवर श्री.स्थापेश्वर मंदिरा समोरूनच बारमाही स्वरूपाचा डेगवे-आंबेखणवाडी ते डिंगणे हा मुख्य रस्ता वाडीच्या मध्य भागातून डौलाने जात आहे. ३० वर्षा पुर्वी या वाडी वसाहतीच्या वेळी पायवाट होती.
तत्कालीन प्रमुख ४ आण्यांच्या वकलाची ( घराण्याची ) हि वाडी लहान असली, तरीही गावाच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक कामात पहिल्या पासूनच या वाडीतील लोक अग्रभागी आहेत, व ती प्रथा आजही आहे. त्या काळी गाव निर्मितीच्या काळात या वाडीवरील वस्ती ठिकाणी पुर्वजांच्या घरा शेजारी भली मोठी आंब्याची राई, झाडे होती. त्यामुळे सदर ठिकाणच्या वसाहतीला ओळखण्यासाठी ‘आंबे -खंड’ असे त्याकाळी लोक संबोधित होते. म्हणून कदाचित”आंबे -खंड” असे नाव घेण्याची प्रथा पडली असावी. त्याकाळी या विभागात आंब्याची झाडे मुबलक होती. म्हणून या वाडीतील लोकांच्या वस्तीला “आंबेखणवाडी”असे साजेसे नांव त्यावेळी दिले गेले असावे. ज्या महापुरुषाने हे साजेसे नांव दिले त्याला समस्थ ग्रामस्थांचे शतशः प्रणाम आहेत…!
काही कालांतराने या वाडी वस्तीतील लोकांची वसाहत हि सद्या अस्तित्वात असलेल्या ठिक-ठिकाणच्या पाण्याच्या उगमस्थानी वसली आहे. शिवाय या वाडीतील महार तळ्याच्या ठिकाणी असलेल्या उगम स्थानापासून सुरु असलेल्या तळीच्या पाण्याच्या; ओहळाच्या मुक्त जलाशयावर, ठिकठिकाणी नारळ, सुपारी, केळीच्या बाग, बागायती उभी राहिली. तेथेच वायगंणी भात, विविध भाजी पाला करून स्थिर स्थावर झाली आहेत.
या वाडीतील ४ आणे वकलातील प्रमुख घराण्यातील लोकांचा पुढे झपाट्याने वेल विस्तारही होऊन आतापर्यंत ५५-६० घरे अर्थात नवीन कुटुंबे झाली आहेत. या लोकांच्या पुर्वजांची त्याकाळी शेती, जास्त होती. त्यामुळे गुरेढोरे जास्तीत जास्त होती..त्यामुळे ती रानातुन घरी आणायचे. त्यावेळी सद्याच्या श्री.ब्राह्मणी स्थळात असलेल्या उगमस्थानी असलेल्या झरीतील पाणवठ्यावर, दुपारच्या वेळी गुरेढोरे यांना पिण्याचे पाणी द्यायचे व नंतर गोठ्यात आणून बांधायचे. शिवाय त्याच झरीतील पाणी घरगुती वापरत होते. असा त्यांचा दिन क्रम होता.
पुढे काही दिवसांनी गावात गुरांच्या
साथीने थैमान घातले होते. सगळीकडे हाहाकार उडाला होता. अशा वेळी ग्रामस्थ हतबल झाले. त्यावेळी दुपारच्या वेळी माळरानातून थरकाप करीत पाण्यासाठी व्याकूळ झालेली गुरेढोरे पाणी पिण्यासाठी या पानवठ्यावर अर्थात तळीवर आली. तेथे गुरांना पाणी दिले. व ते पाणी पिताना काही ग्रामस्थांच्या सहज मनात आले तेथे ग्रामस्थांनी देवतांना गा-हाणे घातले की, या गावात आलेल्या गुरांच्या रोगराई पासून गुरांचा संभाळ करा. या गावात, वाडीत गुरांची कसल्याही प्रकारची रोगराई येऊ देऊ नको. आणि तसे झाले तर आम्ही या ठिकाणी प्रतिवर्षी ” ब्राह्मण भोजन” करु. या नवसाचा दैवी योगायोगाने म्हणा चमत्कार झाला. त्यावेळी या वाडीत रोग राई आली नाही. तेव्हा पासून तेथे स्थानिक ग्रामस्थांनी एक ब्राह्मण आणून “ब्राह्मणभोजन” घालण्यास सुरुवात केली. नंतर तेथे नित्य नेमाने प्रतिवर्षी “ब्राह्मणभोजन” घालण्यास त्यावेळच्या ग्रामस्थांनी सुरू केले.
त्यानंतर त्या काळी ग्रामस्थांच्या नंतर लक्षात आले की, आपण घरगुती पिण्याच्या पाण्यासाठी व गुरांसाठी एकाच झरीतील पिण्याच्या पाण्याचा उपयोग करतो.त्या काळी स्वतंत्र विहिरी नव्हत्या. त्यामुळे गुरांना पाणी देण्यासाठी वेगळा डबका केला. त्याशिवाय ज्या ठिकाणी पाण्याचा उगम झाला त्या ठिकाणी स्वतंत्र भाग करून दगडी विहीर बांधून त्याला स्वतंत्र “तिर्थक्षेत्र” म्हणून घोषित करुया. असा विचार करून या वाडीतील प्रमुख घरण्यांचे मा.श्री. स्व.भानो हरये गांवस, देसाई या मुळ घराण्यातील जेष्ठ वंशज मा.श्री.स्व.भानु तथा झिलु बाबलो गांवस, देसाई (दाजी जाळवंदार) यांच्या शुभ हस्ते को नशिलेचा शुभारंभ केला आहे. शिवाय ‘तिर्थक्षेत्रा’ करीता स्वतंत्र विहिर करून त्याचा पायाभरणी समारंभ त्या काळी वाडीतील इतर ग्रामस्थ बांधवांनी केला आहे. त्यावेळी त्या घराण्यातील व वाडीतील वकलातील घराण्यातील अन्य सर्व मंडळी हजर होती. व त्या ठिकाणी वेगळे “कुंभ” बांधले गेले. नंतर त्याठिकाणी श्रावण महिन्यात हौशी ग्रामस्थ “सोमवार” चे भजन, किर्तन करु लागले. प्रति वर्षी श्रावण महिन्यात सोमवारी” उपाहास” करु लागले त्या नंतर श्रावण महिन्याच्या ५ व्या सोमवारी ‘पंच सोमवार व्रत समाप्ती म्हणून ग्रामदेवता यावर ‘अभिषेक ‘अर्थात श्रावण महिन्याची सांगता म्हणून ५ व्या सोमवारी गावच्या ग्राममंदिरात “श्री माऊली” देवतेवर “अभिषेक”, स्थापेश्वर,महालक्ष्मी देवतांवर “अभिषेक”, ब्राह्मणीस्थळात स्थलाधिपतीवर सुपारी ठेवून “अभिषेक” करुन त्याचे “तिर्थ एकत्र करून” स्थानिक ग्रामस्थांना व त्यांच्या कुंटुबाला, गुरा-ढोरांना देऊ लागले. हे करीत असताना वाडीतील इतर ग्रामस्थ बांधवांना व हितचिंतकांना तिर्थ दिले जात होते. एखादेवेळी गावात सुयेर, सुतक असले तरी ५ व्या सोमवारी एखाद्या-दुसऱ्या पाहुण्यांना बोलावून किंवा भाच्याला आणुन त्या दिवशी देवतावर अभिषेक (एकादशी)करू लागले. हा रिती, रिवाज गेल्या शंभर वर्षा पूर्वीपासून आजही अंखड पणे सुरु आहे, हे विशेष होय.
प्रति वर्षी श्रावण महिना सुरु झाला की, या आंबेखणवाडीतील सर्व ग्रामस्थ त्या श्रावण महिन्याच्या प्रत्येक “सोमवारी” काम धंदा न करता घरातील तुळशीवृंदावना भोवती व प्रत्येकाच्या घरी शेणाने घरदार सारवून रांगोळी घालून सर्व उपवास तपास करु लागले. पुढे हे सोमवार ५ वरुन ग्रामस्थांच्या इच्छेनुसार’ ‘गणेश चतुर्थी’ पर्यंत ७ केले .व ७ सोमवार उपास करु लागले.व ७ व्या सोमवारी “सप्त सोमवार व्रत समाप्ती अभिषेक” (एकादशमी) या वाडीतील ग्रामस्थ एकत्र येऊन श्रावण महिन्याची सांगता म्हणून न चुकता ब्राह्मणाना आणून ग्रामदेवता माऊली पंचायतन देवता,४८खेंड्याच्या स्थापेश्वर, महालक्ष्मी देवतेवर व त्यानंतर स्थलाधिपतीवर म्हणजेच सार्वजनिक तळीवर अभिषेक करून तेथे गा-हाणे करून तिनही ठिकाणचे अभिषेक केलेले “तिर्थ एकत्र” करून आंबेखणवाडीतील ग्रामस्थ बांधव, व हितचिंतक यांना आवर्जून दिले जाऊ लागले.या करीता स्थानिक ग्रामस्थ प्रत्येक कुटुंबा प्रमाणे लोकवर्गणी काढतात. त्या रात्री भजन, किर्तन करतात. एवढी या वाडीतील लोकांची या ‘ब्राह्मणी स्थळावर’ अपार श्रध्दा आहे. शिवाय पुर्वजांची या स्थळीअढळ भक्ती व श्रध्दा या ब्राह्मणीस्थळात ठेवून आजच्या युवा पिढीला वारसा घालून दिला आहे. त्यामुळे त्याचे सर्व बांधवांनी जतन करणे काळाची गरज आहे. श्रावण महिन्याच्या कलावधी धरून सलग ७ सोमवारी या वाडीतील लहान, थोर मंडळी दारु, मांसाहार अजिबात घरी करीत नाही. हे या डेगवे गावातील आंबेखण वाडीचे ‘विशेष वैशिष्ट्य’ आहे. शिवाय या ब्राह्मणी स्थळाभोवती दारु, मांसाहार, वयात आलेल्या मासिक पाळीच्या काळातील व बाळंतपणातील बायकांना प्रवेश निशिध्द आहे.
या आंबेखणवाडीतील सर्व लहानापासून ते वयोवृद्ध ग्रामस्थापर्यंत श्रावणात मासांहार खाणे व दारू पिणे पुर्णता बंद असते. या वाडीतील ग्रामस्थांच्या अपार भक्ती व श्रध्देतुन आणि ग्राम देवता श्री माऊली, श्री.स्थापेश्वर देवता, तसेच स्थलाधिपती, नोपादरच्या कृपेने डेगवे गावात व वाडीत सुख शांती लाभली पाहिजे. कोणत्याही स्वरूपाचे संकट या गावावर, वाडीवर येऊ नये अशी ग्रामस्थांची धारणा होती आले तर ते त्याकाळी दुर होत असे अशी त्यांची मनोमन भावना होती. गावच्या श्री. ब्राह्मणी, ईश्वट्याचा अर्थात नोपादरा देवस्थानचा या स्थळाला लाभलेला वरदहस्त आहे. शेजारच्या डिंगणे गावाला जोडणारा रस्ता लाभला आहे. अशा या सार्वजनिक तुळशीवृंदावनाची पुजा व परिसरातील स्वच्छतेचे काही वर्षे काम अर्जुन विठ्ठल देसाई, यांनी केले आहे.
त्यानंतर वामन सहदेव देसाई हे आता तेथील परीसरातील स्वच्छतेचे काम व नित्य नेमाने पुजा पाठ करीत आहेत.शिवाय या वाडीतील इतर ग्रामस्थ बांधव,लहान मुले नित्य नेमाने त्या ठिकाणी दिवा,बत्ती करीत आहेत.
स्थानिक ग्रामस्थांचे सुस्वर भजन,किर्तन त्या ठिकाणी होत असते. या ठिकाणी प्रतिवर्षी ब्राह्मण भोजन, श्री.सत्यनारायणाची महापुजा . महिला भगिनींचा गौरी पुजनाचा व विसर्जनाचा, देवीच्या भाजी, भाकरीचा कार्यक्रम, वटपौर्णिमा शिवाय, विविध धार्मिक कार्यक्रम येथे गुण्यागोविंदाने व आनंदाने केले जातात.या ठिकाणी सार्वजनिक तुळशीवृंदावन बांधले असून नित्यनेमाने पुजा केली जाते.

उल्हास बाबाजी देसाई.
डेगवे, ता. सावंतवाडी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + 16 =