तिथवलीचे सुपुत्र आणि मुंबईचे नवनिर्वाचित नगरसेवक किरण तावडे यांचा मूळ गावी जंगी सत्कार!
तिथवली गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार – किरण तावडे यांची ग्वाही
तिथवली:
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लालबाग-परळ (वॉर्ड क्र. २०४) येथील नवनिर्वाचित नगरसेवक आणि तिथवलीचे सुपुत्र किरण तावडे यांचा त्यांच्या मूळ गावी ग्रामस्थांच्या वतीने नुकताच भव्य सत्कार करण्यात आला. नगरसेवकपदी शानदार विजय मिळवल्याबद्दल तिथवली ग्रामपंचायत कार्यालयात हा आनंदोत्सव आणि सत्कार सोहळा पार पडला.
या सत्कार सोहळ्याला गावातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने तिथवलीच्या सरपंच प्रियांका हरयाण, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नासिर काझी, तिथवलीचे प्रसिद्ध उद्योजक विजय तावडे, गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष साजिद काझी आणि मुंबई मंडळाचे सचिव अनिल कडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच, माजी पोलीस पाटील गणेश हरयाण, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष हरयाण, सोसायटी चेअरमन ब्रह्मा हरयाण,सोसायटी सचिव दिनकर काडगे, उपसरपंच चंद्रकांत पाष्टे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य रिहाना काझी, सुरेश हरयाण आणि ओमकार हरयाण आदी मान्यवरांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून किरण तावडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गावाच्या विकासाची ग्वाही:
आपल्या या विशेष सत्काराला उत्तर देताना नगरसेवक किरण तावडे यांनी सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “मुंबईतील जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो मी सार्थ ठरवेनच; परंतु माझ्या जन्मभूमीच्या, म्हणजेच तिथवली गावाच्या सर्वांगीण विकासासाठीही मी सदैव कटिबद्ध राहीन.” त्यांच्या या आश्वासनानंतर उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी आपल्या गावच्या सुपुत्राने मुंबईत मिळवलेल्या या यशाबद्दल मोठा अभिमान व्यक्त केला.


