संपादकीय…..
*सावंतवाडी, वेंगुर्ल्यात विशाल परब किंगमेकर…*
*एकच ब्रँड # 5757*
*विजयी मिरवणुकीतील पोस्टरवर राणेंना स्थान नाही*
महाराष्ट्रात झालेल्या नगरपरिषद निवडणुकांचे निकाल रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी जाहीर झाले. यामध्ये सावंतवाडी व वेंगुर्ला नगरपालिकेत भाजपने निर्विवाद वर्चस्व गाजवले. मालवण मध्ये निलेश राणेंनी दत्ता सामंत यांच्या सहकार्याने आपला करिष्मा दाखवत मालवण नगर परिषद शिवसेनेच्या ताब्यात ठेवली तर कणकवली नगरपालिकेत भाजपचे 9 नगरसेवक निवडून आले परंतु 8 नगरसेवकांसह नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी झाले. त्यामुळे तिसरी नगरपरिषद ताब्यात ठेवण्याचे भाजपचे मनसुबे उधळून लावण्यात निलेश राणे यांना यश आले. या निकालावर बोलताना निलेश राणे यांनी एका डोळ्यात अश्रू आहेत तर दुसऱ्यात यश मिळाल्याचा आनंद आहे, एकीकडे नातं आणि दुसरीकडे निवडणूक अशी द्विधा मनस्थिती असल्याचे बोलून गेले.
सावंतवाडी नगरपालिकेचा निकाल अनपेक्षित असाच लागला आणि धनाचा पाऊस पडलेल्या सावंतवाडी आणि वेंगुर्ला नगरपालिकेत भाजपने वर्चस्व गाजवले. सावंतवाडीत 11 जागा जिंकत नगराध्यक्षपद देखील काबीज केले. यावेळी विजयानंतर बोलताना विशाल परब यांनी विजयाचे श्रेय आम.रवींद्र चव्हाण यांना दिले आणि त्यांच्याच करिष्म्यामुळे हा विजय मिळाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आम.रवींद्र चव्हाण यांनी काय करिष्मा केला हे अवघा महाराष्ट्र जाणून आहे. कारण, मालवण येथे राज्यातील सत्तेतील मित्रपक्षाचे आम.निलेश राणे यांनी त्याची ओळख महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या देशाला करून दिली होती. संसदेतही तो मुद्दा उचलून धरण्यात आला होता. विशाल परब यांच्या वक्तव्यानंतर त्यावर केवळ शिक्कामोर्तब झाले म्हणावयास हरकत नाही.
सावंतवाडीतील दमदार विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी “विशालभाई तुम आगे बढो…” अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. यावेळी विशाल परब, वेदिका परब यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे फोटो असलेले बॅनर झळकत होते…आणि त्या बॅनरवर *”किंगमेकर”* असे ठळक अक्षरात लिहिलेले होते. यावेळी आणखी एक बॅनर लक्ष वेधून घेत होता तो म्हणजे निवडणुकीच्या दिवशी शिवसेना भाजप कार्यकर्त्यांच्या मध्ये झालेल्या राड्याच्या वेळी वापरण्यात आलेल्या गाडीच्या नंबरचा… ज्यावर लिहिले होते *”एकच ब्रँड #5757″*….
परंतु…..
यामध्ये कुठेही खास.नारायण राणे किंवा पालकमंत्री नितेश राणे यांच्या नावाचा उल्लेख देखील नव्हता की, त्यांची एकही छबी कुठल्याही बॅनरवर दिसत नव्हती. त्यामुळे राणे समर्थक भाजपच्याच कार्यकर्त्यांमध्ये “आता विशाल परब भाजपाचा मोठा नेता बनला… विशालला मोठ्ठं करून राणेंना संपवायचं आहे की काय..?” असे प्रश्न दबक्या आवाजात एकमेकांना विचारले जात होते. एकंदर परिस्थिती पाहिली असता संपूर्ण जयघोषात राणे समर्थक कार्यकर्ते अभावानेच दिसत होते. जे होते ते केवळ विशाल परब समर्थक आणि रवींद्र चव्हाण यांना मानणारे, त्यांचे चाहते कार्यकर्ते. या संपूर्ण निवडणुकीतून खास.नारायण राणे अलिप्तच राहिले होते. पालकमंत्री नितेश राणे देखील अभावानेच दिसत होते. त्यामुळे राणेंना विश्वासात घेतले जात नसल्याचा राग मनात ठेऊन आम.निलेश राणेंनी भाजपला मालवणात अद्दल घडविली होतीच आणि मालवणात नगराध्यक्षांसह सत्ता आणून निलेश राणेंनी आपला करिष्मा दाखवून दिला आहे. त्याचबरोबर कणकवलीत उबाठा सहभागी असलेल्या सर्वपक्षीय शहरविकास आघाडीला समर्थन देऊन शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष बसविण्याकामी मोलाचे सहकार्य केल्याने कणकवलीवर असलेली भाजपची सत्ता पलटली गेली. त्यामुळे सिंधुदुर्गात अजूनही *#राणे ब्रँड* चालतो याची झलक एकट्या आम.निलेश राणेंनी दाखवून दिली.
कणकवली आणि मालवणमध्ये एकटा नडलेल्या आम.निलेश राणेंनी भाजपला आस्मान दाखवले असतानाही सावंतवाडीतील विजयी मिरवणुकीत पालकमंत्री नितेश राणे आणि खास.नारायण राणे यांना अव्हेरले गेले ही नक्कीच प्रदेशाध्यक्षांच्या किंवा भाजपच्या नव्या खेळीची सुरुवात आहे म्हटल्यास वावगे ठरू नये.
परंतु… राणे कुटुंबाला वगळून पुढील काळात येणाऱ्या जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपची झेप यशाकडे जाईल का..? असा प्रश्न आपसुकच उभा राहत आहे..ज्याचे उत्तर येणारा काळच देणार आहे.
