*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट:३८*
*तुळशीचा लगीन*
“तुळशीचा लगीन केलंय?” आल्याआल्या काकल्याने प्रश्न केला.
“नाही. पौर्णिमेला करणार” मी म्हणालो.
इथे कोकणात कार्तिक शुद्ध द्वादशी ते पौर्णिमा या कालावधीत तुलसीविवाहाची परंपरा आहे. आम्ही श्रीकृष्ण आणि तुळशीचा विवाह लावतो. मंगलाष्टके म्हणून चुरमुरे वाटतो. त्यामुळे प्रत्येक घराच्या अंगणात तुलसी वृंदावन असतेच.
“तुळशीचा लगीन करूकच होया काय?” काकल्या थोडं पुढे सरकला.
“अरे ,आपली ही संस्कृती आहे, परंपरा आहे. ती प्रत्येकाने जपायची.” नीट कारण माहिती नसेल, तर संस्कृतीचे ढोल बडवणं सोपं असतं.
“ह्या रितीच्या पाठी कायतरी कारण आसतला मां?” काकल्या आत शिरू लागला.
“तूच सांग बाबा. मला काय ठावूक नाही. ” मी अंग बाहेर काढले.
तसा काकल्या सावरून बसला. म्हणाला,”लगीन खेच्यासाठी करतंत? संतती वाढवच्यासाठी मां? परत्येक प्राणीमात्राक आपली उत्तम प्रजाती निर्माण करूची आसता. त्येका ‘लगीन’ ही धर्मान दिल्ली संमती हा. ”
मी ‘बरं’ म्हणालो.
“मगे तुळशीचा निस्ता लगीन करून काय उपेग. पावसात रुजलेले तुळशीचे माडे घराभोवती लायले, तर ती झाडाची जात टिकतली. त्येनी शुद्ध हवा मेळतली. तुमी काय केलास? पाव्स सपतकच खळा पोरसू तासून टाकलास.त्येच्या बरोबर तुळशीचे रोपेय उडयलास. फकस्त येक रोपटो वृंदावनात रवलो. ” काकल्या बरोबर बोलत होता. तुळशीच्या लग्ना दिवशी परंपरा जपण्याबरोबर तुळशीचे रोपे लावण्यात निश्चितच भलं आहे.
“तू हे सगळ्यांना सांगायला हवंस. “मी म्हणालो.
“कित्याक? तुका त्वांड नाय. आमच्यासारख्या फाटक्या माणसाचा आयकतलो कोण? तेपेक्षा असा जमता तर बघ. अवनू तू आनी मी घराभोवती तुळशीची रोपा लावन् तुळशीचा लगीन गाजवया. फुडल्या वर्सा आनी येखादो सुधारतलो.” मोलाचा सल्ला देवून काकल्या चालू पडला.
*विनय वामन सौदागर*
आजगाव, सावंतवाडी
9403088802
