*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट: ३६*
*नरकासूराचो सण*
“काय मगे दिये लायलय?” येता येता तोंड वेंगाडत काकल्या बोलला. त्याच्या असल्या बोलण्याचा मला वैताग येतो.
“तू नेहमीच असा कसा रे बोलतोस ?” मी त्याला टोकलंच.
“तुयाच चूकीचो अर्थ काढतंस. अरे ह्यो दियाचो सण हून इचारलंय. हाली मात्र दियापेक्षा ह्यो नरकासूराचो सण झालोहा. आदले दिसा नरकासूर जागयतत आनी फाटेक उठाचा तेवा निजतत. हेंचा अभ्यंगस्नान धा वाजता. खेका धरबंदच रवलो नाय.” काकल्या चटकन मुद्यावर आला.
काकल्याचं म्हणणं खरं होतं. अलिकडे सणात विकृतीच अधिक घुसतेय.
काकल्या पुन्हा बोलू लागला,”तीसेक वर्सापूर्वी कारीट ह्योच नरकासूर होतो, आकाशकंदील मोठो होतो. आता नरकासूर धा हात ऊंच आणि कंदीलाची झालीहा चांदणी. हीच सुधारणा काय रे? तेवा आमी फक्त खोबरा आणि गूळ लावन् नया भाताचे फोव खाव. आता फराळाची ताटा येतत. ह्या कडलेल्या तेलाच्या वासान जीव आदीच आठ दिस कंठाळललो आसता.”
मी गप्पच होतो. काकल्या असं बोलून डोकं गरगरवून सोडतो. खरंच आपण सुधारलोय की ही सूज आहे, हे कळत नाही.
काकल्या थांबून परत म्हणाला, “भावबीजेक माझी आवस् श्रीखंड करी. गोठ्यात गोरवा होती. घरच्या दुधाचो चक्को. आता सून नातवाक रोज बाजारच्या श्रीखंडाबरोबर चपाती भरयता. ”
“अरे बापरे. रोज श्रीखंड? मग आता भाऊबीजेला रे काय करणार?” मी थोडं खोदत विचारलं.
“अरे, आणी काय? भावबीजेक आता चिकन आणि बीयर. तितक्याच रवला हा.” शेवटं तिरकस हाणून काकल्या चालू पडला.
*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
9403088802
