You are currently viewing ज्ञानदीप मंडळाच्या सेंट जोसेफ कॉलेजमध्ये प्रा. डॉ. घोरुडे यांचे स्वागत

ज्ञानदीप मंडळाच्या सेंट जोसेफ कॉलेजमध्ये प्रा. डॉ. घोरुडे यांचे स्वागत

*विद्वान प्राचार्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालय नवे शैक्षणिक शिखरे गाठेल*

 

वसई (गुरुदत्त वाकदेकर) – ज्ञानदीप मंडळाच्या सेंट जोसेफ महाविद्यालयात प्रा. डॉ. घोरुडे तात्यराव नामदेवराव यांनी नवीन प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारला. स्वागत सोहळ्यात मंडळाचे अध्यक्ष फ्रान्सिस तुस्कानो, सचिव अँड्र्यू लोपीस, प्रभारी प्राचार्य, तसेच शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यालय अधीक्षक विल्यम रॉड्रिग्ज ह्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. प्रा. डॉ. घोरुडे यांच्या भौतिकशास्त्रातील शैक्षणिक व संशोधन कार्याचा गौरवपूर्ण परिचय देण्यात आला. त्यांनी ३० वर्षांहून अधिक काळ अध्यापन व २५ वर्षांचे संशोधन कार्य केले असून उपप्राचार्य, विभागप्रमुख व कार्यकारी प्राचार्य म्हणून दीर्घकाळ नेतृत्व निभावले आहे.

 

त्यांच्या मार्गदर्शनाखाली ६ संशोधकांनी पीएच.डी. पूर्ण केली, ५६ संशोधन लेख, १४ ग्रंथ, ३ पेटंट्स व ६ संशोधन प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीज इन फिजिक्स चे अध्यक्ष तसेच विविध शैक्षणिक समित्यांवर त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या शैक्षणिक योगदानासाठी ४ पुरस्कार प्राप्त झाले असून एपीआय स्कोअर १०२०.५ त्यांच्या कार्याचा भव्य पुरावा आहे. मंडळाचे अध्यक्ष फ्रान्सिस तुस्कानो यांनी त्यांना बुके, शॉल व सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालय अधीक्षक विल्यम रॉड्रिग्ज यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी प्राचार्य डॉ. घोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय नवी शैक्षणिक शिखरे गाठेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्रितपणे नव्या प्राचार्यांचे हार्दिक अभिनंदन करून यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा