You are currently viewing “संस्काराचं‌ विद्यापीठ”

“संस्काराचं‌ विद्यापीठ”

 

२ फेब्रुवारी, एक आदर्श माता, उत्तम ग्रुहिणी,आदर्श शिक्षिका, कर्तव्यदक्ष अधिकारी आणि संवेदनशील लेखिका आदरणीय स्व.उषा विद्याधर भागवत बाईंचा तिथीनुसार प्रथम स्मृतीदिन.

एक वर्ष झालं. माझा एकही दिवस असा गेला नाही कि बाईंची आठवण आली नाही. माझा सगळाच प्रवास संघर्षमय, तो अजूनही याना त्या कारणांमुळे सुरुचं आहे…आणि माझ्या या प्रवासातील अनेक साक्षीदारांपैकी आदरणीय भागवतबाईही होत्या. मी कुडासेला असताना बाईनी केलेला सुमारे चाळीस वर्षापूर्वीचा संघर्ष मी माझ्या डोळ्यानी पाहिला. जुन्या काळातील सामाजिक व्यवस्थेशी संघर्ष करणे आणि नोकरी करणे ही फार मोठी कसरत त्या काळात भागवत दांपत्याने केली.पावलोपावली त्यांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागला होता.

विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानल्याने कोणत्याही समाजातील गरीब विद्यार्थी हा परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित रहाता नये यासाठी बाईनी अनेकदा स्वतःच्या पगारातील पैसे खर्च केलेले होते.सामाजिक सुधारणा आणि सुसंस्कृत समाज घडविणारे शिक्षक आजच्या काळात अपवादात्मकच सापडतात. आपणं,आपली नोकरी आणि आपलं कुटुंब या परिघाबाहेर भागवत बाईनी एक आगळ वेगळं जग निर्माण केलं. प्रार्थनेच्या वेळी शाळेत आम्ही नेहमीच आदरणीय साने गुरूजींची प्रार्थना म्हणत असू” खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे”.. हे गीत भागवत बाई आपल्या जीवनात प्रत्यक्ष जगल्या. ज्याच प्रतिबिंब त्यांच्या अनेक कविता, कथा, कादंबऱ्यातून आणि ललीत लेखातून आपल्याला वाचायला मिळत.

भागवत सरांच दुर्दैवी निधन झाल्यावर त्या खचल्या होत्या… पण वास्तव स्विकारुन नव्या दमाने त्यांनी आपलं लेखनं सुरुचं ठेवलं. माझी आणि माझ्या कुटुंबाची त्या सतत काळजी करत.. काही बरं नसल तर फोन करून औषधं सुचवत किंवा आपल्याकडची काही उपलब्ध असलेली आयुर्वेदिक औषधं पण देत.. सतत कुणी भेटल्यावर माझ्या सामाजिक कामाचं भरभरून कौतुकही करतं. एखाद्या गोष्टींच मला टेन्शन आलं तर आपोआप माझे पाय हे त्यांच्या सावंतवाडीतील रविवर्षा या निवासस्थानी वळायचे. एक-दोन तास मस्त गप्पा मारल्यावर नवी उर्जा मिळायची. त्यांच्या निधनापूर्वी साधारण दोन महिने अगोदर वालावलच्या माऊलीच्या दर्शनाला मी त्यांना घेऊन गेलो होतो. श्री देवी माऊलीवर त्यांची खूप श्रध्दा. खरं तर त्यानी माझ्या व माझ्या कुटुंबियांसाठीचं देवीला नवसं केले होते.

भले माझं रक्ताचं नातं नसेल पण सावंतवाडीत माझ्या ह्यदयात कायमचं आदराचं स्थान असलेली जी काही मोजकीच आदरस्थानं होतं.. हाँटेल ताराचे मालक स्व. आबा बांदेकर, स्व.माधवी कुलकर्णी, सबनिसवाड्यातील पराष्टेकर कुटुंबिय आणि आईच्या मायेनं मला जपणाऱ्या आणि मला दिपस्तंभाप्रमाणे असणाऱ्या माझ्या आदरणीय भागवतबाई.

पावलापावलावर त्यांची उणीव भासते… अगदी आठ दिवसांत भेटलो नाही… “काय रे कुठं आहेस?बरा आहेस ना..काळजी घे”… हे शब्द  आणि तो बाईंचा आवाज आजही ऐकू येतो…आणि मग खूपचं एकाकी वाटतं…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिक चळवळीचा आढावा घेतानां भागवत दांपत्याचा उल्लेख केल्याशिवाय तो पूर्णच होवू शकणार नाही. या जिल्ह्यातील साहित्यिक चळवळीमध्ये भागवत दांपत्याचे फार मोठे योगदान आहे. कवी विठ्ठल कदम,जेष्ठ आणि प्रतिभावंत लेखिका सौ. ऊषाताई परब अशा अनेक मंडळीना मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाली ती या दापंत्यामुळेचं.

माझ्या प्रमाणेचं अनेकांसाठी भागवतबाई म्हणजे संस्काराचं विद्यापीठ होत. बाई,तुम्ही दिलेले संस्कार आणि जीवनविषयक विचार तुमच्यासारखे तंतोतंत अंगीकारणे आमच्यासाठी जमणार नाही… पण प्रयत्न जरूर करु हेच आजच्या तुमच्या प्रथम स्मृतीदिनी अभिवचन….

..तुम्हांला भावपूर्ण आदरांजली…

..तुमचाच,

..वात्रट विद्यार्थी…

..नकुल पार्सेकर..

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 6 =