You are currently viewing वसतिगृहातून पळून गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा शोध; पोलिसांच्या रात्रभर मोहिमेला यश

वसतिगृहातून पळून गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा शोध; पोलिसांच्या रात्रभर मोहिमेला यश

उशिरा दरवाजा तोडून मुलींची पलायनाची घटना; सकाळी सुरक्षित ताब्यात, पालकांसह प्रशासनाला दिलासा

सावंतवाडी : तालुक्यातील एका वसतिगृहातून काल रात्री उशिरा दरवाजा तोडून तीन अल्पवयीन मुली पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मात्र, पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवत रात्रभर कसून शोधमोहीम राबवून आज सकाळी या तिन्ही मुलींना सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि पालकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा वसतिगृहाच्या अधीक्षकांच्या ताब्यात असलेल्या तीन अल्पवयीन मुलींनी दरवाजा तोडून वसतिगृहातून पलायन केले. मुली बेपत्ता झाल्याचे व्यवस्थापनाच्या लक्षात येताच वसतिगृह प्रशासनाची एकच धावपळ उडाली. त्यांनी तातडीने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस प्रशासनाने तात्काळ पावले उचलली. पोलिस ठाण्याचा संपूर्ण फौजफाटा रात्रीच शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी रवाना करण्यात आला. मुलींचा माग काढण्यासाठी एसटी बसस्थानके, रेल्वे स्थानक, मुख्य चौक तसेच शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर कसून तपासणी मोहीम राबविण्यात आली. संशयित ठिकाणांची आणि वाहनांची रात्रभर झाडाझडती घेण्यात आली.

रात्रभर सुरू असलेल्या या शोधमोहीमेला आज सकाळी यश आले. पोलिसांना मिळालेल्या एका गोपनीय माहितीच्या आधारे सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास तिन्ही अल्पवयीन मुलींचा शोध लागला. पोलिसांनी त्यांना सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले असून पुढील आवश्यक कायदेशीर प्रक्रिया आणि समुपदेशनासाठी त्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे.

या मुलींनी नेमके कोणत्या कारणामुळे हे पाऊल उचलले, याचा तपास पोलिसांकडून सुरू असून पुढील चौकशीनंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा