You are currently viewing तिलारी धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु

तिलारी धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु

तिलारी धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु

नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

दोडामार्ग

तालुक्यात सध्या मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे तिलारी धरणातील पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ होऊन तिलारी धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून बुधवारी दुपारच्या सुमारास धरणाच्या चारही दरवाजातून विसर्ग सुरू झाला असल्याचे तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांंनी सांगितले आहे.त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे . तालुक्यासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने जोर धरल्याने मुख्य व सर्वात मोठे असलेल्या तिलारी धरणातील पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. मुसळधार पावसामुळे धरणाच्या सभोवताली असलेल्या डोंगरातून मोठ्या प्रमाणात पाणी धरणात जमा होते. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे हे धरण बुधवारपर्यंत भरून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती व तसा इशाराही नदीकाठच्या गावांना दिला होता. मंगळवारी सकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास धरणाची पाणी पातळी १०५.०८ मीटर झाली होती. बुधवारी सकाळी ७:४५ वा.च्या सुमारास १०६.१० मीटर झाली, तर धरणाची सांडवा माथा पातळी १०६.७० मीटर झाल्यास पाण्याचा विसर्ग सुरू होतो. दुपारी २:५० वाजण्याच्या सुमारास या पातळीत वाढ होऊन सांडवा माथा पातळी ओलांडली व धरणाच्या चारही दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. बाहेर पडलेले हे पाणी पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीला येऊन मिळते. शिवाय तेरवण मेढे उन्नैयी बंधाऱ्यातून विसर्ग होणारे पाणी देखील तिलारी नदीपात्रात येऊन मिळत असल्याने तिलारी नदी पात्रातील पाण्यातही कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे अधिकाऱ्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा