साहित्यलेणी सासष्टी महिला संघटनेचा उपक्रम
पणजी, ता. :
जीवन ढवळून टाकणारा बदल सध्या झपाट्याने होत आहे, त्याचे चित्रण उभ्या रेषेचे वर्तुळ या कादंबरीत व सर्वच पुस्तकांत दिसते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक कृष्णाजी कुलकर्णी यांनी केले.
साहित्यलेणी प्रतिष्ठान, सासष्टी महिला संघटना आणि इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझा या तीन संस्थांनी आयोजित केलेल्या पाच पुस्तकांवर चर्चेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. लेखक, प्रकाशक व वाचक अशा तीन पातळ्यावर होणारा साहित्य व्यवहार हा झिरपणारा व्यवसाय आहे, असेही त्यांनी सांगितले.
साहित्यलेणी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष चित्रा क्षीरसागर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दीपा मिरिंगकर यांनी सूत्रसंचालन केले. बबिता गावस, रेशम झारापकर व माधुरी उसगावकर व प्रमोद कारापूरकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तसेच पुष्प आणि भेटवस्तू प्रदान केल्या. संजय पाटील यांनी ईशस्तवन सादर केले. सर्व लेखक आणि लेखिकांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
फणस हा सचिन मणेरीकर यांचा कथासंग्रह ग्रामीण कथा या प्रकारात मोडतो. ग्रामजीवनाचे दर्शन त्यातून घडते. लेखकाने तपशीलवार माहिती द्यायला हवी, काही कथांचा विस्तार करण्याची संधी लेखकाला होती. कऱ्हाडे ब्राह्मणांची बोली व मालवणी यांचा संगम या पुस्तकात आहे, असे मत समीक्षक व साहित्यिक प्रा. विनय बापट यांनी व्यक्त केले. माणुसकी रुजवा हा संदेश या संग्रहातून मिळतो. नातेसंबंध दृढ व्हावेत, असे यातून सूचित होते, असेही ते म्हणाले.
पाळी आणि बरेच काही या पुस्तकावर अपूर्वा ग्रामोपाध्ये यांनी विचार मांडले. हे पुस्तक स्त्रिया आणि पुरुषांनी वाचून त्यावर अभ्यास करायला हवा. पाळी येणे हा स्त्रिच्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहे तसेच ती जाणे म्हणजे मेन्युपॉज हाही तितकाच महत्त्वाचा टप्पा आहे. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर झाले ते १९७५ मध्ये म्हणजे २०२५ मध्ये त्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने अथवा केमिस्टच्या सल्ल्याने पाळी पुढे ढकलण्याच्या किंवा लवकर येण्याच्या गोळ्या घेतात. त्यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्या सुरू होतात. पुरुषांनी स्त्रीला समजून घेतले पाहिजे. पाळी विषयीचे समज आणि गैरसमज दूर करायला हवेत. हे पुस्तक सर्व शंकांचे निरसन करणारे आहे. असे ग्रामोपाध्ये म्हणाल्या.
उभ्या रेषेचे वर्तुळ ही कादंबरी वेगळ्या शैलीची, विषयावरची आहे. एका दिवसाच्या प्रवासाची ही कहाणी आहे. तशी ही शैली दुर्बोध असली तरी गोव्यातील अनेक समस्यांवर प्रकाश टाकणारी आहे. स्त्री वेश्या, पुरुष वेश्या (जिगलो), खाण व्यवसाय, नायजेरियन नागरिकांची समस्या आदी विषयांचा उहापोह या कादंबरीत आहे, असे गजानन देसाई यांनी सांगितले. शेवट परिणामकारक होण्यासाठी लेखकाने अधिक विचार करायला हवा होता, असे ते म्हणाले. शेवट सुंदर आणि सूचनात्मक आहे. असे त्यांनी सांगितले.
अवचिता परिमळू हा काव्यसंग्रह तृप्ती बांदेकर यांनी लग्नानंतर लिहिला. तशा त्या महाविद्यालयीन जीवनापासून लिहीत असल्याने त्यांचा अनुभव समृध्द आहे. अनेक भावनांचे प्रकटीकरण त्यात आहे. त्यांना अचानक ऊर्मी आल्याने त्यांनी कवितालेखन केले. माहेराची ओढ स्त्रीला उपजत असते. त्या कवितात वेगळेपण आणि कोकणच्या मातीचा वास आहे. त्या वाचनीय आहेत. क्लिष्ट नाहीत, असे रजनी अरुण रायकर यांनी सांगितले.
विचारवाटिका हे पुस्तक विचारप्रदर्शक, गोमंतकीय संस्कृतीची माहिती देणारे आहे. काही लेखक प्रासंगिक असले तरी ते सार्वकालिक आहे. गोव्यातील नागरिकांचे ख्रिस्तीकरण आणि राष्ट्रवादाचे दर्शन या पुस्तकात होते. या पुस्तकावर कवी, गझलकार चंद्रशेखर गावस यांनी केले. सहा विषय लेखकाने हाताळले आहेत, असे ते म्हणाले.