मराठी माणसांच्या महाराष्ट्रात गेले तीन महिने पहिलीपासून हिंदी अनिवार्य केलेली आहे की नाही? अशाप्रकारचा राजकीय वाद जोरात सुरू आहे. जो पहिला महाराष्ट्र सरकारने याबाबत आद्यादेश काढला त्यावर प्रखर टीका आणि विरोध झाल्यानंतर दिनांक १७ जून रोजी मध्यरात्री शुद्धीपञ काढून हिंदी सक्तीची नाही. हिंदी ही अनिवार्य भाषा नसून ती सर्वसाधारण भाषा आहे. नवीन शेक्षणिक धोरणात ञिभाषा सूञाचा पर्याय कायम आहे. जर एखाद्या इयत्तेत वीस किंवा त्यापेक्षा जास्त मुले ज्या भाषेसाठी इच्छुक असतील त्यांना तो पर्याय स्विकारता येईल. वगैरे वगैरे या हिंदी भाषेच्या विषयामुळे महाराष्ट्रात राजकारण जोरात पेटले.
एकेकाळी ज्या मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी, स्वाभिमानासाठी शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण भारतात मराठी माणसांचा आवाज बुलंद करणारे मराठी माणसाचे आधारवड स्व. हिंदूह्यदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले त्यांचे पुतणे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या सरकारच्या भाषा विषयक धोरणाला कडाडून विरोध केला. त्यांच्या सुरात सुर मिसळून शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सुद्धा दंड थोपटले. महायुतीत सत्ता भोगत असलेले राष्ट्रावादी पक्षाचे प्रमुख अजितदादा यांनी अगदी दबक्या आवाजात सारवासारव करण्यासाठी विरोधी सूर आळवला.
माञ ज्या बाळासाहेबांचा वारसा आणि शिवसेना पक्षाचा हक्क सांगणाऱ्या शिंदे सेनेने याबाबत नरो वा कुंजरावा ही घेतलेली भूमिका म्हणजे फक्त सत्तेतील लोणी खाण्यासाठीच चाललेला खटाटोप आहे. शिक्षणमंत्री हे पण त्यांच्याच पक्षाचे आहेत. सन्माननीय राज ठाकरे यांना पटवण्यासाठी शिक्षणमंत्री भूसे यांनी त्यांना भेटून सारवासारव केली मात्र याबाबत राज ठाकरे यांचे समाधान झाले नाही… आणि यासाठी आता निर्णायकी लढा सुरू करायचा निर्णय घेऊन पाच जुलै रोजी आंदोलन करण्याची घोषणा केली.. नाही कोणत्याही पक्षांचा झेंडा, मराठी हाच अजेंडा. यात ठाकरे सेना आणि इतर काही पक्ष, संघटना, मराठी बचाव समिती सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व सांस्कृतिक मंञी मा. आशिष शेलार यांनी ठाकरे बंधू हे गैरसमजाचे बळी असून मराठी भाषेचे राजकारण करत आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, “कोणत्याही प्रकारची भारतीय भाषा शिकण्याचा हा पर्याय आहे. त्यामुळे हिंदी भाषा अनिवार्य नसून तो पर्याय आहे” … वगैरे वगैरे, थोडक्यात प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेते या विषयाचे राजकारण करत आहेत.. आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते अजूनही राजकारण करत राहातील.
जगातील अनेक बाल मानस शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधना नुसार बाल वयात मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण दिले पाहिजे. आईच्या उदरातून बाहेर पडल्यावर ते बाळ पण पहिला उच्चार “आ” असाच करते आणि काही महिन्यांनी ते आई म्हणून हाक मारते. अर्थात आजकाल ही असली मानशास्ञीय भाषा आजच्या नेत्यांना समजणे आणि त्याचे आकलन होणे फार कठीण आहे. या सगळ्या राजकारण्यांनी अशाप्रकारचे निर्णय घेऊन आमचेच मानशास्ञ बिघडवून टाकले आहे. मराठी किंवा अमराठी भाषेची सक्ती करताना त्या त्या भाषेत शिकवण्यासाठी तेवढे पुरेसे शिक्षक आहेत का ❓यावर एका शहाण्याने उत्तर दिले की, आॅनलाईन प्रक्रिया राबवू. मुळात शहरी भागात अनेकदा तांत्रिक अडचणीना आजही सामोरे जावे लागते तेथे ग्रामीण, डोंगराळ भागात तुमचा आॅनलाईन फंडा कसा काय राबवणार?
घटनेच्या आठव्या परिशिष्टात ज्या बावीस भाषा आहेत. ञिभाषा सूञाचा विचार करताना, पहिली भाषा किती वर्षे शिकवायची? दुसरी किती वर्षे आणि तिसरी किती वर्षे हे ठरलेले असतानाच अगदी पहिली पासून हे हिंदी भाषेचे भूत कशाला आणल? हे समजण्या पलिकडेचे आहे ज्या अनेक बोलीभाषा बोलल्या जातात त्यांचा उगमच मुळात मराठी भाषेतून झालेला आहे. महाराष्ट्राच्या आदिवासी भागात त्यांची आदिवासी बोलीभाषा बोलली जाते. दक्षिणेतील राजकारण विभागले गेलेले असले तरी आपल्या राज्यातील भाषेचे सक्षमीकरण करण्यासाठी सगळे राजकीय नेते एकञ येतात ज्याचा अभाव आपल्या महाराष्ट्रात जाणवतो. हिंदी ही मराठी पेक्षा प्रबळ भाषा मुळीच नाही. जगभरात ज्या विविध भाषा बोलल्या जातात त्यामध्ये मराठी भाषेचा बोलबाला सगळीकडे असून आपली माय मराठी दहाव्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती ज्यांचा फक्त आणि फक्त सत्तेच्या राजकारणा साठीच उपयोग केला जातो त्या शिवछत्रपतीनी सुमारे साडे तीनशे वर्षांपूर्वी आपला राज्यकारभार हा मराठी भाषेतूनच केला होता. आपली सांस्कृतिक ओळख ही मराठी या भाषेतूनच आहे. दोनशे पैकी ११३ देशात आपली मराठी भाषा बोलली जाते.
भाषा वादात आता राजकारण पेटलेले आहे. दुर्दैवाने या देशात प्रत्येक विषय हा राजकीय भिंगातूनच बघितला जातो, हाताळला जातो. मराठी भाषेचे भांडवल करून आपली दुकाने चालवणारे नेते, संघटना, साहित्यिक, कलाकार ही सगळी मंडळी मुग गिळून का बरे गप्प आहेत? अर्थात याला काही अपवाद आहेत. मात्र हा विषय महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, अस्तित्वाचा आणि शेकडो वर्षांच्या परंपरेचा जतन करण्याचा असून तो राजकारणाचा नाही.
मी, माझ्या प्रिय महाराष्ट्रातील एक मराठी माणूस म्हणून मला मराठी या ज्ञानभाषेचा, अभिजात राजभाषेचा, आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेली भाषा, सुमारे गेली दोनशे पन्नास वर्षे प्रतिभावंत साहित्यिकांनी जी असंख्य पुस्तके, ग्रंथसंपदा निर्माण केली त्या माझ्या मराठी भाषेचा मला सार्थ अभिमान असून माझी माय मराठी हाच माझा श्वास आहे.