गावकऱ्यांच्या श्रमदानातून मळीवाडीचा रस्ता सुकर
स्वखर्चाने माती, ग्रिट व खडी टाकून ग्रामस्थांचा आदर्श उपक्रम; पावसाळ्यापूर्वी वाहतुकीची समस्या तात्पुरती सोडवली
ओसरगाव
“गाव करील ते राव काय करील” या म्हणीचा प्रत्यय ओसरगावातील मळीवाडी येथे आला आहे. पावसाळ्यापूर्वी अत्यंत खराब झालेल्या रस्त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत स्वखर्चाने आणि श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
मळीवाडी परिसरातील रस्ता अनेक ठिकाणी खड्डेमय व चिखलयुक्त झाल्याने पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत होती. पावसाळा तोंडावर आल्याने परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता होती. याची दखल घेत दशरथ शिंदे, दीपक धुरी, तळेकर, दळवी, सकपाळ परिवारांसह अन्य ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.
या सर्वांनी स्वतःच्या खर्चातून माती, ग्रिट व खडी आणून रस्त्यावर टाकली. तसेच प्रत्यक्ष श्रमदान करून रस्त्याची दुरुस्ती केली. ग्रामस्थांच्या या सामूहिक प्रयत्नामुळे सध्या तरी वाहतुकीसाठी रस्ता सुकर झाला असून पावसाळ्यात होणारा त्रास काही प्रमाणात कमी होणार आहे.
गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास अनेक प्रश्न सहज सुटू शकतात, हे या उपक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ग्रामस्थांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे अभिनंदन केले जात आहे.
ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव
या उपक्रमाबद्दल संपूर्ण गावकऱ्यांनी संबंधित ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त केले आहेत. “स्वतःच्या गावासाठी स्वतः पुढाकार घेणे हीच खरी लोकसहभागाची ताकद आहे,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. तसेच विकासकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना उद्देशून काही ग्रामस्थांनी “उघडा डोळे, बघा नीट” असा टोला देखील लगावला.
लोकसहभागातून विकासाचा आदर्श
मळीवाडीतील हा उपक्रम केवळ रस्तादुरुस्तीपुरता मर्यादित नसून लोकसहभाग, सामाजिक एकजूट आणि गावविकासासाठीची तळमळ यांचे उत्तम उदाहरण ठरला आहे. ग्रामस्थांनी दाखविलेल्या या एकीमुळे इतर गावांसमोरही एक सकारात्मक आदर्श निर्माण झाला आहे.
