आंबोली घाटमार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प, मार्ग वाहतुकीस मोकळा…
सावंतवाडी
आंबोली घाटमार्गावरील देवसू-पलीकडचीवाडी येथे जाणाऱ्या कुंभेश्वर रस्त्यानजीक झाड कोसळल्याने सुमारे दीड तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेने तसेच आंबोली घाटातून सावंतवाडीकडे जाणारी अनेक वाहने रस्त्यावरच अडकून पडली होती.
झाड कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ जेसीबी बोलावून कोसळलेले झाड बाजूला हटवले. त्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली. पावसाळा सुरू झाला की घाट रस्त्यालगतची धोकादायक झाडे कोसळण्याची शक्यता निर्माण होते. अशा घटनांमुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होतो, शिवाय अपघात होण्याचीही भीती असते. त्यामुळे संबंधित विभागाने घाटरस्त्यातील अशी धोकादायक झाडे आणि त्यांच्या फांद्या तोडाव्यात, अशी मागणी नागरिक आणि वाहनचालक सातत्याने करत आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच योग्य उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.