You are currently viewing सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत उभ्या राहिल्या अनधिकृत मटका टपऱ्या

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत उभ्या राहिल्या अनधिकृत मटका टपऱ्या

*सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत उभ्या राहिल्या अनधिकृत मटका टपऱ्या*

*सार्वजनिक बांधकाम अभियंत्याचा वरदहस्त..?*

सावंतवाडी शहराचे दक्षिण प्रवेशद्वार असलेल्या सावंतवाडी शिरोडा रस्त्यावरील शिरोडा नाका ते माजगाव हद्दीपर्यंत नगरपालिका गेट परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत अनधिकृतरित्या तीन टपऱ्या उभ्या राहिलेल्या दिसत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या कृपेने त्या टपऱ्या उभारल्या असल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीतून समोर येत आहे.
बेरोजगारी या गोंडस शब्दाच्या नावावर सावंतवाडी शहरात मटका स्टॉल जिकडे तिकडे पहायला मिळतात. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करून कष्टाने पैसे मिळविण्याची वृत्ती हळूहळू लोप पावत चालली असून मार्ग कुठलाही असो झटपट पैसे मिळाले पाहिजेत. या इच्छेपोटी तरुणाई सुद्धा मटक्या सारख्या अवैध धंद्यांच्या नादी लागून बरबादीकडे ओढली जात आहे. शहर आणि आजूबाजूच्या परिसरात चार अँगल उभे करून त्याला पत्र्यांचे आच्छादन करत टपरी सहज उभी केली जाते. अशा टपऱ्यामध्ये कोणतेही मौल्यवान सामान नसल्याने त्याला जास्त सुरक्षेची गरज नसते आणि प्रशासनाने टपरी हटवली तरी मोठे नुकसान होत नाही. त्यामुळे सहजरीत्या शहरात दिवसेंदिवस अनधिकृत टपऱ्या वाढत असून त्यामध्ये खाकिच्या आशीर्वादाने राजरोसपणे मटक्या सारखे अवैध्य धंदे बोकाळले आहेत. परंतु प्रशासनाला याचे काहीही सोयरसुतक उरलेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बांधकामाच्या जागेत अशाप्रकारे अनधिकृत टपऱ्या उभारण्यास मूक परवानगी देत असल्याने ऐतिहासिक शहर ही ओळख पुसली जाऊन सावंतवाडी हळूहळू टपर्यांचे शहर म्हणून ओळखले जाईल की काय..? अशी शंका शहरवासीयांना येऊ लागली आहे.
सावंतवाडी या ऐतिहासिक शहराची ओळख सभ्य आणि सुसंस्कृत सुशिक्षित लोकांचे शहर अशीच होती. जिल्ह्यात केवळ सावंतवाडी शहरात उच्चशिक्षणाच्या सुविधा होत्या. त्यामुळे शहराकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा होता. परंतु अलीकडे शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये बाहेर गावचे अधिकारी येतात आणि ज्यांना शहराशी काहीही देणेघेणे नसते असे अधिकारी शहराच्या अधोगिकरणास कारणीभूत ठरतात. परंतु त्यावर शहरातील कोणाही लोकप्रतिनिधी अथवा आमदार आदी कोणाचाही वचक नसतो. काही लोकप्रतिनिधी स्वतः अवैध्य धंद्यांशी निगडीत असल्याने त्यांचा मटक्या सारख्या अवैध्य धंद्याला छुपा पाठिंबा असतो. किंबहुना काहीजण त्यात सर्वार्थाने सामील असतात. त्यामुळे शहरात मटका व्यवसाय तेजीत आला असून पावसाळ्यात अळंबी उगवतात अशा अचानक एका रात्रीत टपऱ्या उभ्या राहत असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता त्यात आपलं चांगभलं करून घेतात..(?) अशी चर्चा रंगू लागली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा