*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम लेख*
*वटपौर्णिमा*
*सप्तपदी ही रोज चालते*
*तुझ्या सवे ते शतजन्मीचे रे माझे नाते!*
असं भारतीय परंपरा जपणारी प्रत्येक स्री अगदी मनापासून गुणगुणते. विवाह बंधन ही उभयतांनी जपायची एक निरगाठ असते.विवाह करताना हे जाणूनच विधींचे अर्थ समजून
संसारात सार्थकता आणता येते.
सत्यवान सावित्रीची पौराणिक कथा सगळ्यांना ज्ञात आहेच.तेव्हा ही त्या शूरवीर,बुध्दिवान सुकन्येसाठी अश्वपती राजाला योग्य वर मिळेना, अखेर सावित्रीनेच स्वतःचा पतीची निवड केली .जरी सासरे राज्य हरलेले होते,पण सत्यवान कर्तबगार होता,त्यावर विश्वास ठेऊन तिने सत्यवानाशी विवाह करून अरण्यात रहाणे आनंदाने स्विकारले.
बाह्य संपत्ती चा त्याग करून गुणांची व सद्विचारी लोकांची तिने विवेकाने निवड केली.कर्तृत्वावर अढळ विश्वास ठेवत ती कर्तव्य पार पाडत गेली.नारदाने सांगितल्या प्रमाणे सत्यवानाचा मृत्यू जवळ येऊ लागला तेव्हा ती सदैव त्याच्या सोबत राहू लागली.अत्यंत दक्ष.
अखेर तो क्षण आला ,सत्यवान
मूर्छित होऊन खाली कोसळला ते वडाचे मोठे झाड होते.सावित्री ने त्याचे डोके मांडीवर घेताच यमधर्म स्वतः पाश घेऊन न्यायला आले.तेव्हा
सर्व वेदध्यायन,बुध्दीचातुर्य आणि वाक्चातुर्याने यमाशी योग्य युक्तिवाद करून यमाला प्रसन्न केले आणि सासू सासरे,राज्या ुसहीत,पुत्र प्राप्तीसाठी सत्यवानाचे प्राण परत मागितले.हा युक्तिवाद आजच्या घडीला ही अत्यंत उपयुक्त आहे.तेव्हा पासून वडाचे सवाष्ण स्रिया पूजा करून अखंड सौभाग्यदानास्तव पूजन करतात.तो दिवस जेष्ठ पौर्णिमा!
आता परंपरा किंवा रूढी या काळात किती उपयुक्त हा विचार करू या.पूर्वी लवकर विवाह होत,मुलींना घराबाहेर पडण्यास अनेक बंधनं,जाच असे.त्यामुळे नागपंचमी,वटपौर्णिमा असे सण निसर्ग सानिध्यात साजरे केले की प्रसन्न, मोकळे वाटत असे.
नटणं,थटणं,दागदागिने ,नवीन ,जरीची वस्त्रे याचा आनंद घेता येई.एकमेकींच्या भेटी ओळखी होत.शिवाय मुंज झाले ल्या वडाचीच पूजा करायचा प्रघात म्हणजे तो वृक्ष मोठाच असावा,
व त्याच्या जवळ जाऊन पूजनाने कृतज्ञता व्यक्त करावी..
सावली,निवारा प्राणवायू देणारे हे झाड त्याचे जतन करणे कर्तव्य मानत.पूजनीय म्हणून कोणी असे वृक्ष तोडतही नसत.
काळ बदलला तसे दिवसही बदलले ,खेडी गाव सोडून लोकं शिक्षण,नोकरी,व्यवसायासाठी शहरात आले.विभक्त कुटुंबात कोणाच वेळ मिळेनासा झाला.
घरे छोटी ,अंगण नसलेली ,अनेक मर्यादा परंपरावरही आल्या.मुली शिकल्या,लग्नानंतर नोकरी करून आर्थिक सहयोग घरी देऊ लागल्या.
तरीही पतीच्या दिर्घायुष्याची कामना मनात असलेली व्रत पाळून व वटपूजनाने ती संपन्न करत होतीच.धावपळीत,ड्यूटी च्या,मुलांच्या वेळा सांभाळताना
बाहेर वडाला जाणं अशक्य तेव्हा झाडाची फांदी पूजेला आणू लागली.पण इथे विवेक जागा हवा.तोडलेली फांदी म्हणजे झाडाचा अवयवच,ती मृतच होणार तेव्हा सुशिक्षित,समंजस स्रियांनी तरी हे समजून वृक्ष तोड करू नये.
त्याऐवजी वडाचं चित्र काढून,रांगोळीत वड साकारून पूजा करावी.नाही च काही जमले तर..मोठ्या वडाजवळ जाऊन विनम्रपणे नमन करावे व
त्याचे उपकार मानावे.घरी फांदी आणण्यापेक्षा तिथे जाऊन आणि त्याच्या अनेक उपयोगांसाठी त्याचे आभार मानावे.
कुठलीही स्री वनसंवर्धन म्हणून वडाचे झाड त्यादिवशी लावू शकते.त्याचे संवर्धन करावे. वडाची रोपे लावून ट्रीगार्डने संरक्षित करावी.रूजेपर्यंत त्याची काळजी घ्यावी.तीही एक ख-या अर्थाने वृक्षपूजा ठरेल.ज्याची नितांत गरज आजच्या घडीला आहे.
व्रत पाळावे पण दृष्टीकोन बदलून.असं मला वाटतं
पतीनिष्ठा,संसार साफल्य व एकमेकांच्या आधारे संकटातून निवारण ,हा यामागे मुख्य उद्देश.
पण आजच्या स्रीने पतीसाठी जागरूकता बाळगायला हवी,त्याचे वागणे,बोलणे,उत्पन्न,आरोग्य यावर योग्य
लक्ष ठेवावे. आंधळी श्रध्दा उपयोगी नाही.
शेवटी पौराणिक कथेमागील तत्त्व पाळत आपल्याला जे जमेल ,योग्य वाटेल ते करावं.
अनेक परंपरा काळानुसार बदलत गेल्या तशीच ही पण वृक्ष लावून संपन्न करावी,वटपौर्णिमा!
आणखी एक हे व्रत पत्नी पतीसाठी करते मान्य पण काही सत्यवान असेहीआहेत जे मनापासून पत्नीची त्यांच्या अडचणीच्या काळात मदत करतात.वेगवेगळ्या स्वरूपात..
कुणी अचानक मोठ्या आजाराची शिकार,तर कोणाला पक्षाघात,अशा वेळी तनमन धनाने पत्नीची सेवा अविरतपणे करणारे सत्यवान पाहिले आणि व्रत हे पत्नीचेच नसून दोघांसाठी आहे याची स्पष्ट जाणीव झाली. सख्यांनो, माझे विचार या लेखातून मी आज आपल्या पर्यंत पोहचवले आहेत. एक सुंदर सामाजिक विषय वटपौर्णिमेचा मिळाला आणि लिहिती झाले ..अनेक धन्यवाद!🌳✍️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
लेखिका.. अरुणा दुद्दलवार दिग्रस यवतमाळ.