You are currently viewing ‘ज्ञानेश्वरमाउलींची ओवी सात्त्विक दानाचे रूप!’ – डॉ. संजय उपाध्ये*

‘ज्ञानेश्वरमाउलींची ओवी सात्त्विक दानाचे रूप!’ – डॉ. संजय उपाध्ये*

*’ज्ञानेश्वरमाउलींची ओवी सात्त्विक दानाचे रूप!’ – डॉ. संजय उपाध्ये*

पिंपरी

‘सकल विश्वासाठी पसायदान
मागणार्‍या ज्ञानेश्वरमाउलींची
ओवी सात्त्विक दानाचे रूप आहे!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार डाॅ. संजय उपाध्ये यांनी काशीधाम मंगल कार्यालय, चिंचवडगाव येथे रविवार, दिनांक ०८ जून २०२५ रोजी केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित ‘मन करा रे प्रसन्न’ या मासिक प्रवचनमालिकेंतर्गत ‘दान सात्त्विकाचे’ या विषयावरील ६८वे मासिक प्रवचनपुष्प गुंफताना डाॅ. संजय उपाध्ये बोलत होते. प्रा. बाळकृष्ण माडगूळकर, सुदाम मोरे, प्रभाकर नाळे, अभय कुलकर्णी, सागर देशपांडे, अजय लोखंडे आणि गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रवचनापूर्वी, सलग ६८ महिने काशीधाम मंगल कार्यालय प्रवचनसेवेसाठी विनाशुल्क उपलब्ध करून दिल्याबद्दल गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या वतीने अवधूत कुलकर्णी आणि कुटुंबीय यांना विधिवत मंत्रोच्चारात गोंदवलेकरमहाराज यांच्या नित्यपाठ स्तोत्राची भव्य प्रतिमा डाॅ. संजय उपाध्ये यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आली.

डाॅ. संजय उपाध्ये पुढे म्हणाले की, ‘जी गोष्ट समाजाकडून आपल्याला मिळावी असे प्रकर्षाने वाटते, तीच गोष्ट आपण आधी समाजाला द्यायला शिकले पाहिजे म्हणजे कालांतराने ती गोष्ट दुप्पट, तिप्पट प्रमाणात तुम्हाला मिळते. अर्थातच हा निसर्गाचा नियम आहे. सत्त्व, रज, तम या तीन गुणांपैकी समाजात सत्त्वाचा अभाव आहे; कारण स्वत्व शिल्लक राहिलेले नाही. लाभ अन् लोभ यांची तुलना केल्यानंतर केलेले दान सत्त्व, रज, तम यापैकी कोणत्या गुणांनी युक्त आहे हे लक्षात येते. दान हे संपत्तीचेच असले पाहिजे असे नाही. ज्ञानदान, विचारदान, सौहार्दाचे दान असे सात्त्विक दानाचे विविध प्रकार आहेत. जे दान दिल्यावर विसरता येते किंवा ज्यात ‘मी’पणाची भावना नसते त्यालादेखील सात्त्विक दान म्हणता येईल. सात्त्विक दान देणारा सात्त्विक असला तरी ते घेणाराही सात्त्विक वृत्तीचा असला पाहिजे. देण्याची वृत्ती आणि दानत असणारा समाज समृद्ध असतो, असे आढळून येते. निरपेक्षपणे देणारा निसर्ग हे सात्त्विक दानाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. त्यामुळे जगण्याच्या दैनंदिन प्रक्रियेत सात्त्विक गुणांचे अधिक्य जोपासले पाहिजे!’ संतवचने, कविता, विनोद, किस्से उद्धृत करीत खुसखुशीत शैलीतून डाॅ. संजय उपाध्ये यांनी निरूपण केले. महेश गावडे, नवनाथ सरडे, बंडू भोकरे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. सुहास पोफळे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा