सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांच्या आत्महत्या चिंतेचा विषय…..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांच्या आत्महत्या चिंतेचा विषय…..

संपादकीय…..

महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा पट्ट्यात कर्जाच्या ओझ्याखाली दबून, सावकारांच्या ससेमिऱ्याला कंटाळून होणाऱ्या शेतकऱ्यांचा आत्महत्या हा विषय गेली काही वर्षे महाराष्ट्रासाठी चिंतेचा विषय बनला होता. शेतकऱ्यांना कर्ज माफी वगैरे देण्याच्या घोषणा झाल्या, काही प्रमाणात अंमलबजावणी झाली परंतु तरीही आत्महत्यांचे सत्र मात्र सुरूच राहिले. वडील गेल्यावर पोरकं होणार घर आणि कर्जाचा डोंगर घेऊन पार कोलमडून गेलेलं कुटुंब. यामुळे अनेक संसार वाऱ्यावर पडले, होत्याचे नव्हते झाले. परंतु कोकणात मात्र आत्महत्यांचे लोण कधीच आले नाही. शेतकरी आत्महत्या ह्या कोकणात कधीच झाल्या नाहीत.
गेल्या वर्षभरात कोरोनाने देशात हाहाकार उडवला. अनेकांचे रोजगार, नोकऱ्या गेल्या उद्योगधंदे बंद पडले. त्यामुळे शासकीय नोकऱ्या वगळता इतर नोकरदार वर्ग जगण्यासाठी धडपड करू लागला. काहींनी नोकरीच्या मागे न लागता आपले छोटेसे व्यवसाय उभे केले, भाजीपाला, मासे आदी वस्तू विक्रीचे व्यवसाय सुरू केले, त्यातून आपल्या कुटुंबाला आधार देण्याचे प्रयत्न सुरू झाले. परंतु अपयशाला न घाबरता संकटांचा सामना करत खंबीरपणे उभे राहिले आणि वाईटातून चांगल्याचा शोध लावला ते कोरोनाच्या संकटातही टिकले आणि स्वतःच्या कुटुंबासही आधार बनले. कारण त्यांच्या अंगी जिद्द होती, संकटांशी दोन हात करण्याची ताकद होती, कष्ट, मेहनत करण्याची त्यांची तयारी होती. आणि महत्वाचे म्हणजे त्यांना जीवनाशी न हरता जगण्याची, झगडण्याची त्यांच्या घरातून मिळालेली शिकवण होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांमध्ये कित्येक तरुण मुलांनी, लग्न होऊन नुकताच संसार थाटलेल्या युवकांनी आत्महत्ये सारखा भ्याड मार्ग स्वीकारला आहे. कित्येक तरुण मुंबई, पुणे, गोवा सारख्या ठिकाणी कामाला होते, परंतु नोकऱ्या गेल्यामुळे गावात येऊन मोलमजुरी करण्याची, काहीही नवीन काम शिकण्याची तयारी नसल्याने आणि गावाकडे चांगली कामे, व्यवसाय, उद्योगधंदे, कारखाने इत्यादींची उपलब्धता नाही त्यामुळे बेकारीला कंटाळून तर कोणी दारूच्या नशेच्या आहारी जात स्वतःच अमूल्य जीवन संपवत आहेत. पेपरमध्ये, सोशल मीडियावर अशा बातम्या वाचून पुन्हा एखादा बेकार तरुण तोच मार्ग अवलंबत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे.
गेली अनेक वर्षे आत्महत्या ह्या जिल्ह्यासाठी माहिती नसलेलाच विषय असायचा. कधी एखादी आत्महत्या झालीच तर ती प्रेमप्रकरण अथवा दारूच्या नशेत. परंतु कोरोनाच्या संकटानंतर जिल्ह्यात आत्महत्या वाढल्या. वाढत्या बेकरीमुळे नैराश्यातून अनेकांनी आपलं जीवन संपवलं. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आत्महत्यांचे लोण आल्याची जाणीव व्हायला लागली. जिल्ह्यात आजपर्यंत एकही रोजगार देणारा उद्योग आला नाही किव्हा जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वाने कुठला कारखाना, उद्योग व्यवसाय जिल्ह्यात आणला नाही. जिल्ह्यातील तरुणांना गेली अनेक वर्षे शिकून मुंबई, पुण्यात चाकरी करण्यासाठी जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कित्येकांचे म्हातारे आईवडील मुले बाहेरगावी असल्याने हलाखीत गावात दिवस काढतात, आणि अशा आई वडिलांना सोडून नोकरीसाठी मुलांना बाहेर जन्य खेरीज पर्याय नसतो. जिल्ह्यात रोजगार, उद्योगधंदे नसल्याने जिल्ह्याची अवस्था सुजलाम सुफलाम जिल्हा असूनही बेरोजगारांचा जिल्हा असल्यासारखी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, शेतीव्यवसायकडे आकर्षित होण्यासाठी शेती कर्ज, व्यवसाय मार्गदर्शन आणि शेतीतून, व्यवसायातून येणाऱ्या मालाला उत्तम बाजारपेठ उपलब्ध करून देणे ही काळाची गरज बनलेली आहे. जिल्ह्यातील आंबा, काजू, कोकम, फणस इत्यादी विपुल प्रमाणात येणारी फळे ही चांगली बाजारपेठ नसल्याने कवडीमोल भावाने विक्रीस जातात त्यामुळे त्यांच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग जिल्ह्यात उभे राहिले पाहिजेत. तरच जिल्ह्यातील कष्टकरी तरुण कष्टातून उभारलेल्या व्यवसायातून पैसा उभा करू शकेल आणि यशस्वी युवकांच्या पावलांवर पाऊल ठेवत नैराश्यामुळे आत्महत्यांसारखे पर्याय स्वीकारणारे तरुण देखील मोठ्या उमेदीने जगण्यास सुरुवात करतील.
परंतु जिल्ह्यात आमूलाग्र बदल घडवायचा असेल तरजिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, आणि नेत्यांची जनतेच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा हवी तसेच शासनाच्या अधिकाऱ्यांची देखील आपण जनतेचे सेवक आहोत, त्यामुळे जनतेसाठी काहीतरी करण्याची त्यांची मानसिकता हवी. सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी देखील आपली जबाबदारी म्हणून तरुणांमध्ये ऊर्जा निर्माण होईल, आत्महत्यांसारख्या प्रवृत्तींपासून दूर राहून समाजात मानाने जगण्यासाठीचे समाजप्रबोधन होणे आवश्यक आहे. तरचव्यसनाकडे आकर्षित होणारा, भरकटलेला आजचा तरुण युवावर्ग आत्महत्यांसारखा पर्याय सोडून नोकरी उद्योग, व्यवसायाकडे झुकला जाईल आणि जिल्हा तरुणांच्या आत्महत्त्या रोखण्यात सफल होऊल.
फक्त गरज आहे ती, राजकर्त्यांच्या नेत्यांच्या जिल्ह्यासाठी काहीतरी करण्याच्या मानसिकतेची आणि सामाजिक संस्थांच्या समाजप्रबोधनाची…!!

प्रतिक्रिया व्यक्त करा