You are currently viewing स्क्रीप्ट ते स्क्रीनचा प्रवास…

स्क्रीप्ट ते स्क्रीनचा प्रवास…

कोल्हापूर शॉर्ट फिल्म क्लब आणि अर्भाट शॉर्ट फिल्म क्लब, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, भाषा भवन, शिवाजी विद्यापीठ यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम २७ एप्रिल २०१९ रोजी आयोजित केला गेला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्या मार्गदर्शनपर हा कार्यक्रम होता. भाषा भवन हॉलमध्ये स. १०:३० ते दु. २:०० असा हा दृश्य-श्राव्य माध्यमासंदर्भातला हा कार्यक्रम नुकताच पार पडला. मलाही या कार्यक्रमाची माहिती मिळाली, तेव्हा वेगळे नक्कीच काही ऐकायला मिळणार अशी उत्सुकता वाटत राहिली. सुनीलसरांचे चित्रपट सर्वश्रूत आहेतच. आज त्या सर्वांची चित्रपट रसास्वाद या सदरात चर्चा होणार होती विशेषतः दोघी, वास्तुपुरुष, देवराई, अस्तू, कासव इत्यादी. तांत्रिक जोडणी आणि पूर्तता यांची जमवाजमव व्हायला थोडा वेळ लागला पण सर्व आलेले लोकही तितकेच रसिक असल्याने कुणी आढेवढे घेतले नाहीत.

कार्यक्रम थोडा उशिरा सुरू झाला, मुख्य अतिथींच्या व प्रा.मेधा पानसरे यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा प्रारंभ कॅमेरा पूजनाने झाला. त्याचेही इथे विश्लेषण केले गेले. इतर कार्यक्रमाची सुरवात श्रीगणेश पूजनाने होते, तर चित्रपट रसास्वाद या कार्यक्रमाची सुरवात अशा प्रकारे होते, कारण कॅमेरा हाच पहिला प्रेक्षक असतो चित्रपटाचा व दृश्यमाध्यमाचा असे सुनीलसरांनी संभाषणाच्या सुरवातीसच सांगितले. यांतच या कार्यक्रमाचे वेगळेपण जाणवले. त्यांनी सुरवातीपासूनचा प्रवास सांगण्यास सुरवात केली. त्यांचे या क्षेत्रातील प्रथम गुरूवर्य सतीश बहादूर यांचाही उल्लेख केला. गेल्या काही वर्षांत झालेले कॅमेरा-लेन्स यांच्यातील बदल समजावून सांगितले. मनात असूनही कॅमेरातल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभावामुळे काही दृश्ये टिपता आली नाहीत, सुरवातीच्या काळांत चित्रपट बनवताना असेही त्यांनी मत व्यक्त केले.

प्रत्येक चित्रपट हा वेगळा विषय घेऊन निर्माण करताना काय-काय अडचणीला सामोरे जायला लागते याची सविस्तर माहिती दिली. सुमित्राताई भावेंनी त्यांच्या प्रत्येक चित्रपट विषयाला कसे उत्तम सहकार्य दिले. या सगळ्या विषयावरचा अभ्यास चित्रपटांसाठी अनेकदा फायदेशीर ठरला. त्यांनी हाही मुद्दा मांडला की लेखकाचे माध्यम शब्द असतात तर, दिग्दर्शकाला स्थळाचा, काळाचा, प्रसंगाचा, आजूबाजूच्या परिस्थितीचा, नायक-नायिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करावा लागतो. समाजातील काही वर्ग व स्त्री जीवनाचा, समस्यांचा अभ्यास सुमित्राताईंनी केलेला आहे. तो जर दृश्य-श्राव्य माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आला तर ते अधिक प्रभावी ठरेल असा या सर्वांनी विचार केला. पुस्तकातून एका विशिष्ट वर्गापर्यंतच हे अनुभव पोहोचवता येतात, पण चित्रपट हे जिवंत व थेट अनुभव माध्यम आहे. एखाद्या परप्रांतातल्या भाषेतला विषय अभिनयाद्वारे प्रेक्षकवर्गाच्या मनापर्यंत नेता येतो.

सुनीलजींनी ही सुद्धा माहिती दिली की चित्रपटांतील दृश्ये, प्रसंग यांचा अनुक्रम लावायचा तर प्रथम हे सगळे कागदावर उमटले पाहिजे. कागदावरच्या लेखनातून [संहितेतून] अनेक गोष्टी स्पष्ट होतात, उत्तमरीतीने साकारता येतात. प्रत्येक दृश्याचा स्वतंत्रपणे अभ्यास करता येतो. त्या गोष्टी कलाकारांनाही समजून घेऊन आत्मसात करणे सहज सोपे होते. आज कॅमेराच्या आधुनिक तंत्रज्ञानातील प्रगतीने खूप गोष्टी कल्पनेपेक्षाही अत्यंत चांगल्या रितीने पडद्यावर उमटताना दिसतात. या सगळ्या संभाषणात मधून-मधून त्यांनी काही चित्रपटांचे भाग दाखविले उदाहरणादाखल ‘दोघी’ या चित्रपटातील काही दृश्ये आधी घेऊन मग चित्रपट तयार करताना त्याचा उपयोग कसा केला जाऊ शकतो याचे मार्गदर्शन जमलेल्या प्रेक्षकवर्गाला व विद्यार्थीवर्गाला केले. ‘वास्तुपुरुष’ या चित्रपटांत दीर्घकाळानंतर परदेशांतून परतलेल्या एका डॉक्टरांची कथा सांगितली गेली आहे. त्यांच्या बालपणीच्या आठवणीत हा चित्रपट उलगडत जातो. अशाच प्रकारे नितळ, देवराई, अस्तू, कासव इत्यादी चित्रपटांबद्दल या कार्यक्रमांत सखोल माहिती महत्वाच्या दृश्यांद्वारे देण्यांत आली. या सगळ्यांत मधूनमधून छोटा परिसंवादही घडत होता. प्रश्न विचारताच समाधानकारक उत्तरेही सुनिलजींकडून मिळत होती.

चांगली माहिती, अनुभव मिळत असतानाच कार्यक्रमाची सांगता होत आहे असे लक्षांत आले. एक वेगळे विश्व नजरेसमोर उलगडत असताना ज्यांनी या कार्यक्रमाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली त्यांचे मी सभागृहाच्या बाहेर येताच आभार मानले.

 

✒️मेघा कुलकर्णी, रत्नागिरी

© मेघनुश्री [लेखिका, पत्रकार]

भ्रमणध्वनी : ७३८७७८७५१२

प्रतिक्रिया व्यक्त करा