You are currently viewing महन्मंगला

महन्मंगला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*’ महन्मंगला ‘*

 

आधाराची एकच जागा जन्मदायिनी जगात असते

ढाल बनूनी बाळासाठी उभी ठाकते सदैव आई

बाळासाठी अंधारातच कडा उतरली शूर हिरकणी

काळालाही झुंज देवुनी घेई जिंकुन जिद्दी आई

 

अनाथ असती त्यांच्यासाठी मायेचा जी पदर पसरते

वात्सल्याने बनत यशोदा जीव लावते कोमल आई

चिंता असता आई पाशी जीव विसावे बळ घेऊनी

जगात अवघ्या हितचिंतक ती ओढ लावते वत्सल आई

 

नसे मागणी नसे अपेक्षा नुसते देणे माहीत तिला

हसतमुखाने घरातल्यांना स्नेह वाटते प्रेमळ आई

अहोरात्र जी कष्टत असते मंदिर बनवी घरात सुंदर

भूलोकी या स्वर्ग सुखाने झोळी भरते केवळ आई

 

अनुपमेय ती एकच व्यक्ती ईश्वर वसतो तिच्या अंतरी

मातृछत्र ते शिरी लाभता भाग्यवंत मी घरात आई

परमेशाचे कोडे अद्भूत कशी बनवली त्याने आई

महन्मंगला आयुष्याचे वैभव असते हसरी आई

 

ज्योत्स्ना तानवडे. पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा