“सावंतवाडी शहराचा स्वाभिमान असलेल्या अर्बन बॅकेचे अखेर अस्तित्व संपुष्टात’….
सावंतवाडी
संस्थानकालीन सुंदर सावंतवाडी शहराला सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सहकार चळवळीचीही फार मोठी परंपरा आहे. जुन्या जाणत्या सेवाभावी लोकांनी या शहरातील अनेक संस्था उभारून या शहराचा नावलौकीक वाढवला. ज्यामध्ये काही जुन्या नावाजलेल्या शिक्षण संस्था पण आहेत. दक्षिण कोकणातील सावंतवाडी अर्बन बॅक ही त्या काळातील छोट्या- मोठ्या व्यापाऱ्यांची कामधेनूच होती. ज्या बॅकेच्या सहकार्याने त्या काळात व्यापाऱ्यानी आपला उद्योग व्यवसाय वाढवला व आर्थिक सक्षमीकरण केले. सावंतवाडी कन्झ्युमर्स सोसायटी ही त्या काळात ग्राहकांच्या विश्वासास पाञ ठरलेली आणि कोट्यवधी रूपयांची उलाढाल करणारी ग्राहक संस्था जी आता शेवटची घटका मोजत आहे.
अशा संस्थाचे राजकीय अड्डे झाले की त्यांची कशी वाताहत लागते? ?यावर फार मोठा प्रबंध लिहिता येईल. बरं अशा संस्थावर आर्थिक शिस्त लावणाची इच्छा असणारी तज्ञ मंडळी व्यवस्थापनावर जावू शकत नाही कारण त्यांच्याकडे कार्यक्षमता असली तरी निवडून येण्याची कुवत नसते. बरं आर्थिक बेशिस्तवर चौकशी करून कारवाई कोण करणार?
गेल्या पंचवीस वर्षात या कार्यकाळात बॅकेचे व्यवस्थापन पहाणाऱ्या मंडळींनी अतिशय “चोख” कारभार केला. अशा कामासाठी आपल्या कौटुंबिक प्राथमिक गरजा बाजूला ठेवून बॅकं वाचवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. राजकीय सत्तेचा आधार असतानाही त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नाला यश आले नाही. “जागतिकीकरण आणि भारतीय रिझर्व्ह बॅकेचे आर्थिक धोरण यामुळे बॅक सावरता आली नाही. अर्थात व्यवस्थापन मंडळातील अतिशय अनुभवी आणि आर्थिक विषयाचा प्रचंड अभ्यास असणाऱ्या आणि ग्राहकांमध्ये व भागधारकांमध्ये प्रचंड विश्वास संपादन केलेल्या संचालक मंडळाला त्यांच्या प्रयत्नाना यश आले नाही. नाईलाजाने सावंतवाडी शहराची अस्मिता असलेल्या सावंतवाडी अर्बन बॅकेचा फलक आज उतरवण्यात आला आणि ज्या ठाणे जनता सहकारी बॅंकेत याचे विलीनीकरण करण्यात आले त्याचा फलक आज लावण्यात आला.
बॅंक “वाचवण्यासाठी” प्रयत्न करणाऱ्यानां निश्चितच यामुळे वाईट वाटले असणार… मी एक या बॅंकेचा भागदारक आणि सजग सभासद म्हणून वाईट वाटले…
आता महत्त्वाचा प्रश्न ठाणे जनता सहकारी बँक ज्या भागधारकांचे शेअर्स आहेत ते परत करणार आहेत का ❓❓