सावंतवाडीत दहशतवादविरोधी बॅनर हटवल्याने वादंग
नगरपरिषद प्रशासना विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
सावंतवाडी
पेहेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निषेध नोंदविण्यासाठी सावंतवाडी शहरात हिंदुत्ववादी संघटनांनी लावलेला बॅनर नगरपरिषदेने हटवल्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी थेट मुख्याधिकारी आणि पोलिस निरीक्षकांना घेराव घालून जाब विचारला. मिळालेल्या माहितीनुसार, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू जागरण मंच आणि सकल हिंदू समाज, सिंधुदुर्ग या संघटनांनी संयुक्तपणे मोती तलाव शिवउद्यान लगत तीन मुशी परिसरात एक बॅनर लावला होता. या बॅनरवर अफझलखान वधाचे चित्र होते आणि ‘४०० वर्षांपूर्वी आपल्या शंभूराजेंना धर्म बदलला नाही म्हणून मारले आणि आजही २७ लोकांना धर्म विचारूनच मारले. काहीच बदलले नाही. म्हणून, तुम्ही किमान नाव विचारूनच खरेदी करा. १०० टक्के आर्थिक बहिष्कार’ असा मजकूर लिहिण्यात आला होता. ‘दहशतवाद असाच संपवावा लागतो’ असा आशयही बॅनरवर नमूद करण्यात आला होता. बॅनर लक्ष वेधून घेत होता.
यानंतर मंगळवारी सायंकाळी नगरपरिषद प्रशासनाने अचानक हा बॅनर हटवला. या कारवाईपूर्वी मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी शहरात अनधिकृतपणे लावलेले आणि शहराच्या सौंदर्याला बाधा आणणारे बॅनर, होर्डिंग्ज, फ्लेक्स, पोस्टर्स हटवण्याचे निर्देश दिले होते. तसेच, प्रिंटर्सनी नगरपरिषदेच्या परवानगीशिवाय असे साहित्य छापू देऊ नये, असेही बजावले होते.
यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील राजकीय पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि प्रिंटर्स व प्रकाशकांची बैठकही आयोजित केली होती. या बैठकीत मुख्याधिकारी अश्विनी पाटील आणि पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण उपस्थित होते.
दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनेने लावलेला बॅनर काढल्याची माहिती मिळताच कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मुख्याधिकारी व पोलिस निरीक्षकांना घेराव घातला. कार्यकर्त्यांनी शहरात असलेले सर्वच अनधिकृत बॅनर तात्काळ काढण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे सावंतवाडी शहरात खळबळ उडाली असून, पुढील काळात प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.