*मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय काव्यसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न*
मुंबई: साहित्य क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय तृतीय काव्यसंमेलन संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा कांदिवली, मुंबई येथील आकुर्ली शाळेच्या सभागृहात थाटात पार पडला. महाराष्ट्रातील दिग्गज गझलकार, कवींनी काव्यसंमेलनात आपल्या बहारदार रचना सादर करून रंगत आणली. सातत्याने साहित्यिक योगदान देणाऱ्या सारस्वतांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तक या स्वरूपात पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध गझलकार ए. के. शेख, प्रमुख अतिथी गझलकार मान.डॉ.मनोज वराडे, उद्घाटक गझलकार किरण वेताळ, स्वागताध्यक्षा विनिता कदम, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कु.मानसी पंडित, निखिल कोलते, सचिव राजेश नागुलवार (राजमन), सोनाली जगताप, डॉ.मानसी पाटील आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेने सिंधुताई सपकाळ यांच्या पुणेस्थित संस्थेला १२०००/- देणगी जाहीर..
काव्यसंमेलनाचे उद्घाटन गझलकार श्री किरण वेताळ यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पून करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कु.मानसी पंडित यांच्या सुमधुर आवाजातील “साहित्याच्या अंगणी चमके मनस्पर्शीचा तारा..” या मनस्पर्शीच्या बोधगीत गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. संमेलनाच्या स्वागताध्यक्षा विनिता कदम यांनी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख, उद्घाटक किरण वेताळ, प्रमुख अतिथी गझलकार डॉ.मनोज वराडे आदी मान्यवरांचे शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव मार्गदर्शक राजेश नागुलवार (राजमन) यांनी करून संस्थेच्या पाच वर्षातील कार्याचा आढावा घेतला. संस्थेच्या कार्य. सदस्या सोनाली जगताप यांनी स्वागताध्यक्षा विनिता कदम यांचे स्वागत, सत्कार केला. कार्यकारिणी सदस्या डॉ.मानसी पाटील यांनी सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला.
उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना श्री किरण वेताळ यांनी संस्थेच्या आणि विशेष करून कमी वयात स्वतःच्या व्यंगावर मात करून साहित्य सेवा करण्यासाठी धडपडणाऱ्या श्री.निखिल कोलते याचे तोंड भरून कौतुक केले. त्याचबरोबर मराठी साहित्य निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कु.मानसी पंडित यांचा शब्दसुमनांनी गौरव केला. यावेळी त्यांनी गावच्या आठवणींवर “भूपती वैभव” वृत्तातील बहारदार रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
ज्या वयात भिन्नलिंगी व्यक्तीच्या प्रेमात पडतात त्या वयात मानसी, निखिल साहित्याच्या प्रेमात पडले. “आम्ही बिघडलो तुम्ही बिघडावे” जणू असे म्हणत त्यांनी इतरांनाही साहित्य निर्मितीसाठी प्रेरित केले. असे गौरवोद्गार काढून प्रमुख अतिथी गझलकार डॉ.मनोज वराडे यांनी निखिल, मानसी या द्वयींचे कौतुक केले. *”आजुबाजूला काळोख दाटतो तेव्हा कोणीतरी दीपस्तंभ व्हावं लागतो… ए. के. शेख सर त्यापैकीच एक दीपस्तंभ..!”*
असे आदरपूर्ण वक्तव्य गजलगुरु ए. के. शेख यांच्या बाबत करून डॉ.मनोज वराडे यांनी गझलकार ए. के. शेख यांच्या गझलेच्या क्षेत्रातील योगदानाचा यथार्थ गौरव केला. स्त्रीच्या सन्मानार्थ त्यांनी..
*”केवडा जाई जुई बकुळीस तू टाळून ये*
*पण जो तुझ्यावर भाळतो तो मोगरा माळून ये..”*
असा गझलेचा एक शेर सादर करून आताच्या सरकारवर गझलेमधून भाष्य करताना *”कोणते आले पहा सरकार येथे…मातले आहेत नेते फार येथे..”* अशी गझल रचना सादर करून मार्मिक टिपण्णी केली.
*”केवलानंद हाच आपला उद्देश असावा, कवीने आनंद द्यावा आणि आनंद घ्यावा” : ए. के. शेख
असे सांगत संस्थेचे नावच मनाच्या आरपार जातं एवढे सुंदर मनाला हळुवार स्पर्श करणारे संस्थेचे नाव आहे.. असे भाष्य केले. मानसी पंडित यांनी गायलेले स्वागतगीत रचणाऱ्या डॉ.मानसी पाटील यांना उद्देशून सदर गीत हे संस्थेचे बोधगीत व्हायला हरकत नाही असा शेरा मारत, त्यांनी लिहिलेल्या गीतातील शब्दांमध्ये किंचित फरक करून ते गीत गझलेत रूपांतरित करून गझल लिहिण्यासाठी प्रेरित केले.
*”गझल म्हणजे कुणा रुपवतीचे लयबद्ध पदन्यास..*
*गझल म्हणजे जिवंत काळजाचा ठोका…”*
काव्य म्हणजे शब्दातील संगीत आणि संगीत म्हणजे काव्यातील आनंद..मराठीत “व” (अरेबिक) “नि” हे दोन शब्द वगळले की बाकीचे एकाक्षरी शब्द दीर्घच असतात. असे सांगून गझल अभ्यासाबाबत अत्यंत सोप्या शब्दात मार्गदर्शन करून गझल लिहिण्यास साहित्यिकांना पद्युक्त केले.. गझल लिहित असाल तर मी तुमच्यासाठी रात्रंदिवस उपलब्ध आहे, असे वक्तव्य करून आपले गझलेवरील प्रेम किती उत्कट आहे याची प्रचिती दिली. सकारात्मक लिहायचं, नकारात्मक लिहायचं नाही..लोकांना आनंद, प्रोत्साहन मिळेल असंच सांगायचं.. १२ तास असलेल्या सूर्याच्या उजेडाचं कौतुक करा, १२ तास अंधार असतो हे का सांगता..? असे म्हणत ते पुढे म्हणाले, माझे गुरू पी.सावळाराम सांगायचे..
“गझल, कविता हा डोक्याने लिहायचा प्रांत नाही ती हृदयाने लिहायची…”
यानंतर त्यांनी आपल्या तीन गझल रचना तरन्नुम मध्ये सादर केल्या. यात
*”डाव मित्राचेच होते नेमके
घाव मित्राचेच होते नेमके..
मी मला माहीत होतो कोण तो
आव मित्राचेच होते नेमके…”*
आणि…
*”मी योजिले मनाशी अन् काय होत गेलो
नियतीपुढे असा मी असहाय होत गेलो…
शेवटी
*”गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय..*
*महागाईने पिचलेल्याना होळी काय दिवाळी काय..”*
अशा सर्वांच्या मनाच्या जवळ असलेल्या गझला सादर करून त्यांनी गझलेबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रेम, ओढ निर्माण केली.
पूर्वी राधा कृष्ण आणि उर्दू मधून लैला मजनू यावर लिहून प्रेम व्यक्त करायचे..आता मनमोकळे लिहू लागलेत असे सांगून काव्यसंमेलनातील प्रत्येक कवीच्या सादरीकरणाचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन मानसी पंडित आणि निखिल कोलते यांनी केले तर आभार राजेश नागुलवार राजमन यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*या कवींच्या सादरीकरणाने रंगली मैफिल*
अद्विता कुलकर्णी…मी देवाची लाडकी, शरद नवाळे …..ममतेचा दरवळ, सानिका गायकवाड….आजोबा, प्रतिभा कुलकर्णी….अहोंची मदत, राज ठाकूर …..त्या तिन्ही सांजवेळी, ज्योती घनघाव….नातं तुझं माझं, दीपक पटेकर….तू भेटशील तेव्हा, दीपाली घाडगे….आंदण, डॉ सुभाष कटकदौंड….येताना तू नकळत ये, माया कारगिरवार …..वादळ, पल्लवी भागवत….कवन, ऋचा पारेख …..खरे प्रेम, शीतल सावंत …तिलाही जगू दे, योगिता तकतराव ….माझ्यातल्या मुलीला जगू द्या, शुभा खांबेकर पानसरे ….मन
ममता गडग ….जीवन, पल्लवी वढवेकर….गझल, ऋचा पत्की ….गणित जीवन, सुलक्षा देशपांडे…अनुबंध, जयश्री चौधरी…. दान
प्रेमा खांडवे…..खेळिया, भावना काळे ….पेटलेली भूक, संतोष लंकेश्वर… मी परिवर्तनाचा ग्राहक
हरिश्चंद्र निवारण…पहाट, अदिती पटवर्धन….बुडणारा सूर्य, वैशाली बोकिल …..वसंतोत्सव, सुचिता मेहेंदर्गे…..काजवा, स्मिता उधळीकर….श्रावण आला, सोनाली देशमुख….माय मराठी, सरोज भिडे…. शैक्षणिक प्रगती, अदिती मसूरकर…. महाराष्ट्राची राजकन्या लावणी, सुभाष मोहनदास गझल, दिपाली वैद्य….चित्ती केवळ कृष्ण असू दे, दक्षा संखे…..अज्ञातांचे देणे
*पुरस्काराचे मानकरी*
यावेळी मनस्पर्शी प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर सातत्यपूर्ण साप्ताहिक स्तंभलेखन – (पद्य विभाग) सौ. विनिता कदम – शब्दगंध, डॉ. सौ. मानसी पाटील – कवितेचे पान आणि श्री. दीपक पटेकर – अंतरंग, सौ. राधा गर्दे – शब्दपर्ण,
#साप्ताहिक स्तंभलेखन –(गद्य) सौ. विजया भांगे – कप्पा काळजाचा, डॉ. विनय दांदळे – सप्तरंग, अरुणा मुल्हेरकर – द शो मस्ट गो ऑन आणि आशा दोंदे – रंगरेषा यांना सर्वोत्कृष्ट स्तंभलेखनसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
#मासिक स्तंभलेखन – (पद्य विभाग) सौ. अदिती मसुरकर – ढोलकीच्या तालावर, सौ. विजेता चन्नेकर – संतांचे अभंग, सौ. अरुणा गर्जे – मनाचा गाभारा, सौ. पुष्पा सदाकाळ – मनीच्या चांदण्यात
#मासिक स्तंभलेखन – (गद्य विभाग) सौ. राधिका भांडारकर – जगताना जाणवले, पांडुरंग कुलकर्णी – पी.व्ही.के चिंतनमाला, ऋचा पत्की – शब्दांचा गाभारा, सौ. सुनिशा कुलकर्णी – भारतीय संस्कृतीतले १६ संस्कार, सौ. तनुजा प्रधान – संवाद मनाचे, सौ. शुभा खांबेकर-पाणसरे – कळा लागल्या जीवा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
#विशेष उल्लेखनीय स्तंभलेखन पुरस्कार सौ.ज्योत्स्ना तानवडे यांना देण्यात आला. तर #YouTube उपक्रम पुरस्कार- कविता रसग्रहण सौ. रेणुका धनंजय मार्डीकर, कथा अभिवाचन करिता श्री.अंबादास ठाकूर, सौ. प्रेमा जयंत खांडवे यांना गौरविण्यात आले आणि जयश्री चौधरी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले.
यावेळी विविध स्पर्धा मध्ये सहभागी सारस्वत आणि परीक्षकांना देखील गौरविण्यात आले आहे.
मुख्य आयोजनात सहकार्य करणारे श्री. ताराचंद कदम, सौ. योगिता तकतराव, श्री. आनंद साटम, श्री. लक्ष्मण देशमुख यांनाही विशेष सन्मानित करण्यात आले.