दोडामार्गमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रशिक्षण शिबिर यशस्वी
५० विद्यार्थ्यांचा सहभाग; लाठीकाठी, तलवारबाजी व आत्मसंरक्षणाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण
दोडामार्ग :
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांची ओळख निर्माण व्हावी या उद्देशाने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. श्री शंभो छत्रपती मर्दानी आखाडा यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर दिनांक २४ ते २८ एप्रिल दरम्यान दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात घेण्यात आले.
या शिबिरात शाळेतील तसेच तालुक्यातील इतर मिळून सुमारे ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. पाच दिवस चाललेल्या या प्रशिक्षणामध्ये लाठीकाठी, तलवारबाजी आणि आत्मसंरक्षण यांसारख्या शिवकालीन युद्धकलेचे सखोल मार्गदर्शन प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात आले.
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना पूरक आहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी विक्रांत विकासभाई सावंत, सामाजिक कार्यकर्ते गणेश गावडे, पालक गणेश ठाकूर, सोमनाथ नाईक, धाकू वरक तसेच मुख्याध्यापक संजय पाटील यांनी सहकार्य केले.
समारोप प्रसंगी पालक सोमनाथ नाईक यांनी प्रशिक्षकांचा शाल, श्रीफळ व पेन देऊन सत्कार करत आभार व्यक्त केले. या शिबिराचा संपूर्ण आर्थिक भार विक्रांत विकासभाई सावंत यांनी उचलला होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिवकालीन युद्धकलेचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळाल्याने पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
