गोवा येथे ‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२६’बाबत प्रशिक्षण संपन्न
एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये
-जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
सिंधुदुर्गनगरी
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आगामी ‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२६’ (SIR 2026) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुसज्ज प्रशिक्षण उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात यशस्वीरीत्या पार पडले. या प्रशिक्षणामुळे आगामी मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रिया अधिक अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक होण्यास मोठी मदत होणार आहे.
या प्रशिक्षणाचे आयोजन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. गोवा राज्यात यापूर्वी SIR 2026 चे कामकाज अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्याने त्या अनुभवाचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट केले की, आगामी पुनरिक्षणात कोणताही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, हीच प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता राहणार आहे.
उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी मार्गदर्शन करताना मतदार यादी दोषरहित ठेवण्यासाठी काटेकोर नियोजन, तांत्रिक अचूकता आणि क्षेत्रीय पातळीवरील समन्वय अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, प्रत्येक मतदाराचा समावेश सुनिश्चित करणे ही लोकशाही सुदृढ करण्याची मूलभूत गरज आहे.
प्रशिक्षणादरम्यान उपजिल्हा निवडणूक अधिकारी सफल शेटये, मामलेदार अक्षया आमोणकर, संजीवनी सातार्डेकर तसेच नोडल अधिकारी प्रा. मंगेश प्रभुदेसाई यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. यामध्ये क्षेत्रीय कामकाजाचे नियोजन, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे नियंत्रण, पुनरिक्षण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना, तसेच मतदार नोंदणी अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यातील समन्वय या महत्त्वपूर्ण बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रशिक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी, विविध तालुक्यांचे तहसीलदार, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, निवडणूक नायब तहसीलदार तसेच संगणक चालक (ऑपरेटर्स) आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश निवडणूक प्रक्रियेत तांत्रिक अचूकता वाढवणे, मतदार यादीची पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ व परिणामकारक करणे आणि SIR 2026 मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा होता.
