११ मे ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
खासदार नारायण राणे यांची कणकवलीत पत्रकार परिषद
कणकवली :
कणकवलीतील करंजे येथे गोवर्धन गोशाळा उभारण्याचे काम सुरू आहे. त्याचे उद्घाटन ११ मे रोजी सकाळी ११.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. राज्यातील वेगळी अशी गोशाळा असणारा असून येथे देशभरातील विविध प्रकारच्या गाई पाळल्या जातील. माझ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी याठिकाणी विविध प्रकल्प ही राबवण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी ‘ओम गणेश’ या आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
श्री. राणे म्हणाले, हिंदू धर्मात गाय ही पवित्र मानली जाते. गाय असेल तिथे समृद्धी नांदते. यासाठी गुजरात पासून अनेक ठिकाणी मी गोशाळा पाहिल्या, त्यानंतर येथे वेगळी चांगली गोशाळा उभारण्याचा संकल्प केला. या ठिकाणी गीर जातीची तसेच अनेक जातीच्या गाई असणार आहेत. लातूरची देखणी गाय असणार आहे सध्या ८० गिर गाई आहे. आणखीन २० येणार आहेत.
गाय पाळल्यामुळे अनेक गोष्टींमधून उत्पन्न मिळवता येते. गोशाळेत गायीच्या दुधाच्या फॅटही तपासले जाईल. गीर गायीच्या दुधापासून मिळणाऱ्या तुपाला दहा हजार प्रतिकिलोपर्यंत दर मिळतो. लोकांनी असा व्यवसाय करावा, गायी, म्हशी पालनाकडे वळावे आणि समृद्ध व्हावे असा यामागे हेतू आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारावी, दूध संकलनाची व्यवस्था, पैसेही त्वरित देण्याची व्यवस्था केली जाईल, या गोशाळेत शेणही पाच रु. किलो विकत घेतले जाईल गॅसनिर्मिती होईल. स्थानिक गायींचे गोमुत्रही विकत घेतले जाईल. खताची फॅक्टरीही होईल असे अनेक प्रकल्प याठिकाणी शेतकऱ्यांसाठी होतील, असे श्री. राणे यांनी सांगितले.
शेणापासून रंगाची निर्मिती केली जाते. जयपूर येथे असा रंग तयार करून शासकीय कार्यालयांना दोनशे रु. लीटरपर्यतच्या दराने दिला जातो. त्यामुळे एक गाय पाळली तर किती अर्थकारण होऊ शकते, हे येथील शेतकऱ्यांना समजून येईल आणि त्यांचा विकास होईल. गायीपासूनचा सर्व पैसा येथील शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी माझे हे सर्व प्रयत्न आहेत, असे श्री. राणे यांनी सांगितले.
शेळी मेंढी पालनातूनही शेतकरी समृद्ध होऊ शकतात, आजही ६० टक्के मांस येथे मिळते तर ४० टक्के मांस आयात करावे लागते. आफ्रीकन शेळीचे वजन ४० ते ६० किलोपर्यंत असते. उस्मानाबाद, खालीयर जातीच्या शेळी मेंढीपासूनही उत्पन्न चांगले मिळते. असे व्यवसाय करून शेतकऱ्यांनी आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही तयार आहोत. १९८२ पासून आम्ही मुंबई चिकनचा व्यवसाय करायचो. मात्र करप्शन करण्यापेक्षा धंदा करणे बरे, कोविडमध्ये जनतेसाठीचा पैसा खाण्यापेक्षा आम्ही धंदा करून कमवतो, असा टोलाही श्री राणे यांनी लगावला.