You are currently viewing आठवणीतील धन्वंतरी”…

आठवणीतील धन्वंतरी”…

“आठवणीतील धन्वंतरी”….
अॅड. नकुल पार्सेकर..

आज सायंकाळी सावंतवाडी पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीत असताना एक दु:खद बातमी येवून धडकली, ” डॉ. श्रीपाद कशाळीकर यांचे देहावसान “…

वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जीवनात शिस्त शिकवणारे आणि आपण स्वतः पाळणारे एक शिस्तीचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे डॉक्टर कशाळीकर. जीवन सार्थकी लावणे म्हणजे काय❓ याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर कशाळीकर. भले त्यांनी खूप मोठी समाजसेवा केली नसेल पण आदर्श माणूस म्हणून तमाम सावंतवाडी करांसाठी ते आदर्श होते हे नाकारून चालणार नाही. जुन्या काळातील काही डॉक्टरांना देवमाणूस म्हणतात ज्यामध्ये स्व. डॉ. लोकागारीवार, बांद्याचे डॉ. खानोलकर आणि डॉ. कशाळीकर यांचे नाव घेता येईल. झपाट्याने झालेल्या तंत्रज्ञानामुळे डॉक्टरी पैशाचा तंञ आणि मंञ हे सगळचं बदललं. नवनवीन संशोधनामुळे डॉक्टरी पेशा हा गतीमान झाल्याने “Yes We are human beings” हे अनेकजण विसरूनच गेले अर्थात हा दोष त्यांचा नाही तर तो या स्पर्धात्मक जगात झपाट्याने होणाऱ्या परिवर्तनाचा आहे. अशाही परिस्थितीत आपल्या वैद्यकीय पैशाची शान आणि मान राखणाऱ्या डॉक्टरांपैकी एक कशाळीकर डॉ.
मला आठवत, १९८१ मध्ये मी सावंतवाडीत महाविद्यालयीन शिक्षणासाठी आलो तेव्हा ताप- सर्दीने आजारी होतो. सबनिसवाड्यात ज्या पराष्टेकर आजोबांच्या घरात भाडेकरू म्हणून होतो, ते मला म्हणाले, अंगावर काढू नका, सालईवाड्यात डॉ. कशाळीकराकडे चला, ते तुम्हांला तांबड औषध देतील.. आणि आपल्याकडच्या गोळ्या.. दोन दिवसात बरं वाटेल”मी तातडीने त्यांच्याकडे गेलो. छोटासाच दवाखाना पण रुग्णांना मार्गदर्शन करणाऱ्या सुचना आणि सगळच अगदी टापटीप. माझा नंबर आल्यावर आत गेलो. मला तपासत असताना अगदी सहजपणे माझी आत्मीयतेने सगळी चौकशी केली. त्यांच्याकडच्याच बाटलीतून औषध दिले. गोळ्या दिल्या आणि एका कागदावर सुवाच्य अक्षरात औषध कशी घ्यायची हे पण लिहून दिले.. आणि सगळ्याची फी फक्त दोन रूपये घेतली. रुग्णांशी सुसंवाद साधण्याची त्यांची जी स्टाईल होती त्यातच अर्धा रुग्ण बरा व्हायचा. दोन दिवसात मला पण आराम मिळाला. रुग्ण म्हणून त्यांची व माझी ही पहिली “ग्रेट भेट”
डॉक्टरांचे व्यक्तीमत्व अष्टपैलू होते. ते उकृष्ट चिञकार होते, उत्तम वाचक होते, कलाप्रेमी होते, संवादक होते आणि उत्तम विश्लेषक पण होते. त्या काळात गोविंद नाट्य मंदिरात नावाजलेल्या व्यवसायिक नाटक कंपन्याची जी जी नाटके सादर होत ती पहाण्यासाठी पहिली घंटा वाजायच्या अगोदर थिएटरमध्ये पहिल्या रांगेत सपत्नीक डॉ. बसलेले असायचे. ते फक्त नाट्य रसिकचं नव्हते तर साहित्यिक गप्पाटप्पा मध्ये त्यांना विशेष रस असायचा. त्या काळात आता सारखे खळखळाट असणारे साहित्यिक नव्हते. होते ते ताकीदीने लिहिणारे प्रतिभावंत साहित्यिक ज्यांच्या परिसंवादाचा रसास्वाद घ्यायला डॉ. आवर्जून उपस्थित असायचे.
मला आठवत एकदा वि. स. खांडेकर हायस्कूलमध्ये जेष्ठ नाट्यलेखक स्व. ल. मो. बांदेकर यांच्या अंबा या नाटकावर रसग्रहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. ज्या कार्यक्रमला स्व. दिनकर धारणकर, स्व रमेश चिटणीस, स्व. प्रा. वाडेकर, माझा मित्र प्रशांत सावळ आणि स्वतः लेखक बांदेकर व डॉ. कशाळीकर होते. यावेळी त्या नाटकाचा आशय डॉ. रानी इतका अभ्यासपूर्ण मांडला ते ऐकून स्वतः लेखक आश्चर्यचकित झाले. संस्कृत भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते.
अनेकदा अशा विविध कार्यक्रमात भेट व्हायची. अगदी वर्षेभरापूर्वी त्याना त्यांची मारूती गाडी चालवताना मी पाहीलयं.अगदी सेंकड गेरध्ये साधारण पंधरा ते वीसच्या गतीने ते आपल्या माठेवाडा येथील निवासस्थाना पासून दवाखान्या पर्यंत जायचे. खरोखरच कौतुकाचा विषय आहे हा.
मी १९८२ मध्ये पोस्टात असताना दोन तीन वेळा साहित्यिक गप्पांचा कार्यक्रम प्रा. वाडेकर यांच्या निवासस्थानी झाला होता. ज्याला स्व. पांडूरंग नेने, स्व. वसंत कार्लेकर व मी उपस्थित होतो. आम्ही तिघेही पोस्टातले आहोत हे पाहून डाॅक्टरानी विनोदी लेखक पु. ल. देशपांडे यांचे “पौष्टिक जीवन” या पुस्तकावर रसग्रहण सादर केले होते. त्यांच्या संपर्कातील अनेकजण हे जग सोडून गेले… आणि आज त्यानीपण एक्झिट घेतली. वक्तशीरपणा हा त्यांचा आणखीन एक भावलेला गुण. दैनंदिन कामाची यादी करून त्या नुसार त्याची अंमलबजावणी करायची हा त्याचा आग्रह. आठवणी अनेक आहेत. कार्यबाहुल्यामुळे खूप दिवस त्यांची भेट झाली नाही… पण भेटल्यावर भरभरून कौतुक करणारे आणि मनापासून शाबासकी देणारे डॉ. आज आमच्यात नाहीत याचे खरोखरच दु:ख आहे. कसे जगावे? याचा आदर्श मंञ देणाऱ्या या धन्वंतरीना माझी भावपूर्ण आदरांजली!

प्रतिक्रिया व्यक्त करा