बाळासाहेबांची शिवसेना आणि जिल्ह्यातील पूर्वीचे शिलेदार.

बाळासाहेबांची शिवसेना आणि जिल्ह्यातील पूर्वीचे शिलेदार.

विशेष संपादकीय…..

बाळासाहेब…. मराठी माणसांची अस्मिता ज्यांनी जपली, मराठी माणसांना मुंबईत मानाने रहायला शिकवलं ते बाळासाहेबांनी. बाळासाहेब फक्त हिंदूंसाठी लढत नव्हते तर सर्व समाजाला सोबत घेऊन राजकारण करत होते. शिवसेनेत सुद्धा कितीतरी मुस्लिम समाजाचे लोक नेतेपदावर होते आणि आहेत. कट्टर राष्ट्राभिमान जपणारे मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत, तो आपला माणूस , अशीच त्यांची भावना होती. बाळासाहेबांनी दगडाला देखील हिरा बनविला. रस्त्यावरील अनेकांना बाळासाहेबांनी शिवसेनेच्या नेतेपदावर आणून त्यांच्या आयुष्याचे सोने केले, राजकीय पटलावर कित्येकांना मानाचे स्थान दिले, समाजात ताठ मानेने उभे केले. स्वतः किव्हा घराण्यातील कोणालाही कोणत्याही राजकीय पदावर न आणता त्यांनी शिवसैनिकांना राज्याच्या राजकारणात मंत्रिपद, मुख्यमंत्रीपद देखील दिले.
बाळासाहेबांचे कोकणावर खूप प्रेम होते. कोकणच्या विकासासाठी जर कोणी खरे प्रयत्न केले असतील तर ते बाळासाहेबांनी. कोकणला पहिले मुख्यमंत्री पद सुद्धा दिले ते बाळासाहेबांनीच. कोकणात शिवसेना रुजली होती, परंतु मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणातील बाळासाहेबांचे विश्वासू शिलेदार नारायण राणे सिंधुदुर्गात आले आणि खऱ्या अर्थाने जिल्ह्यात शिवसेना वाढली. जिल्ह्याची सर्वच सत्तास्थाने शिवसेनेच्या ताब्यात आली. नारायण राणेंसोबत त्यांचे कट्टर समर्थक राजन तेली, काका कुडाळकर, संजय पडते इत्यादींनी शिवसेना वाढविण्यासाठी खडतर प्रयत्न केले. जिल्ह्यात सेना वाढलीच, नारायण राणेंच्या समर्थकांना देखील मानाची पदे मिळाली. राजन तेली विधानपरिषद सदस्य म्हणून देखील राज्यपातळीवर गेले. संजय पडते, काका कुडाळकर जिल्हापरिषद अध्यक्ष, जिल्हा प्रमुख आधी पदांवर राहिले होते. नारायण राणे स्वतः मंत्री, मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेतेपदावर कित्येक वर्षे राहिले. शिवसेनेच्या अति महत्वाच्या पदांवर नारायण राणे यांनी अधिराज्य गाजविले.
उद्धव ठाकरे शिवसेनेच्या प्रवाहात कार्यरत झाल्यावर मात्र नारायण राणे यांचे त्यांच्याशी मतभेद झाले आणि राणेंनी शिवसेना सोडली. त्यांच्या सोबतच त्यांचे शिलेदार सुद्धा सेनेतून बाहेर पडले. आज बाळासाहेबांनी घडवलेले, बाळासाहेबांच्या प्रेरणेने राजकीय पटलावर तेजाने चमकलेले राजन तेली एका पक्षातून दुसऱ्या प्रवेश करत भाजपामध्ये जिल्हाध्यक्ष पदावर आहेत. काका कुडाळकर देखील पक्ष बदल करत करत राष्ट्रवादी मध्ये प्रवेशकर्ते झाले, परंतु त्यांची राजकीय इनिंग कधीच प्रगतीपथावर गेली नाही. संजय पडते नारायण राणे यांची साथ सोडून पुन्हा सेनावासी होत जिल्हाध्यक्ष पदी विराजमान झाले. एकंदरीत बाळासाहेबांना रामराम करून गेलेले बाळासाहेबांनी दिलेल्या पदांपेक्षा मोठ्या पदांवर कधीच गेले नाहीत.
नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेस, स्वतःचा स्वाभिमान पक्ष असा प्रवास करत भाजपावासी झाले. राज्यसभेवर खासदार पदी निवडून आणून भाजपाने त्यांना पद दिले. परंतु बाळासाहेबांच्या शिवसेनेत असताना राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जी धुरा बाळासाहेबांनी सोपविली होती तशी मात्र कोणत्याही पक्षाने नारायण राणे यांना धुरा दिली नाही. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर मुख्यमंत्री होण्याचे नारायण राणे यांचे स्वप्न अधुरेच राहिले.
आज बाळासाहेबांची जयंती. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, बाळासाहेबांना मानणारे सर्वचशिवसेना सोडून गेले तरी त्यांना मानवंदना देतील, परंतु बाळासाहेबांनी मिळवून दिलेला मानसन्मान मात्र दुसरे कोणीही, कोणताही पक्ष देऊ शकत नाही याची खंत मात्र प्रत्येकाच्या हृदयात राहील.

प्रतिक्रिया व्यक्त करा