You are currently viewing अखेर कणकवली टेंबवाडी मधील ती पाणंद मोकळी होणार

अखेर कणकवली टेंबवाडी मधील ती पाणंद मोकळी होणार

कणकवली :

कणकवली शहरातील नवीन रस्ते तयार करून विकसित करण्यावर नगरपंचायत सत्ताधाऱ्यांकडून भर दिलेला असतानाच कणकवली शहरातील अंतर्गत पाणंद वाटाही मोकळ्या करून जनतेला सोय उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांकडून कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेले काही वर्षे प्रलंबित असलेल्या टेंबवाडी येथील छात्रालय ते जानवली नदीपर्यंत पाणंद खुली करण्याबाबत नगरपंचायत कडून हद्द कायम मोजणी करण्यात आली. भूमिअभिलेख कणकवली कार्यालयामार्फत ही मोजणी प्रक्रिया करण्यात आली असून, स्वतः नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मोजणी वेळी जागेवर उपस्थित राहत जमिन मालकांशी चर्चा करून नकाशावर असलेली पाणंद मोकळी करण्याबाबत पुढाकार घेतला. कणकवली टेंबवाडी येथे टेंबवाडी रस्ता ते छात्रालय कडून जानवली नदीपर्यंत नगरपंचायतीच्या डीपी प्लान मध्ये पाणंद प्रस्तावित आहे. मात्र या पाणंदिच्या मार्गावर काही ठिकाणी अडथळे असल्याने या मार्गावर असणाऱ्या कॉम्प्लेक्स व नागरिकांच्या घरांना योग्य प्रकारे रस्ता उपलब्ध होत नव्हता. याबाबत नागरिकांनी नगराध्यक्ष श्री नलावडे यांचे लक्ष वेधल्या नंतर नगरपंचायत कडून या बाबत हद्द ठराव मोजणी करिता भुमिअभिलेख कडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार भूमिअभिलेख कणकवली कार्यालयाकडून प्रत्यक्ष जागेवर येत शुक्रवारी मोजणी करण्यात आली. या मोजणीत काही ठिकाणी जमीन मालकांच्या खाजगी जागा पाणंदीच्या वाटेवर येत असल्याने या जमीन मालकांशी नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी चर्चा केली. जमीन मालकांकडूनही या पाणंदसाठी सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्याचे श्री नलावडे यांनी सांगितले. गेले काही वर्षे हा प्रश्न प्रलंबित असताना तो आता मार्गी लागल्याने टेबवाडी नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या मोजणी प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत, नगरसेवक शिशीर परुळेकर, सुदीप कांबळे, राजू गवाणकर व जमीन मालक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − nineteen =