बँकेचे व्यवहार कामकाज मराठीतुनच करा

बँकेचे व्यवहार कामकाज मराठीतुनच करा

मनसे पदाधिकार्‍यांनी घेतली बँक शाखा अधिकाऱ्यांची भेट

मराठीचे वावडे असलेल्या अधिकाऱ्यांना मनसे स्टाईल शिकवु

बँक आस्थापनातील व्यवहार व कामकाज मराठीतून करण्यात यावे या मागणीसाठी येथील मनसेच्या पदाधिकार्‍यांनी स्टेट बँक शाखा व युनीयन बँक शाखेच्या शाखाधिकार्‍यांची भेट घेत निवेदन सादर केले. बँकेतील बरेच अधिकारी, कर्मचारी हे परप्रांतीय आहेत. त्यामुळे त्यांना मराठी शिकविण्याचा उपक्रम हाती घ्यावा. ज्या अधिकार्‍यांना, कर्मचार्‍यांना मराठीचे वावडे असेल त्यांना राज्याबाहेर जाण्यास सांगावे अन्यथा मनसेच्यावतीने त्यांना मराठी शिकविण्याचे काम मनसे स्टाईलने केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.मनसेचे तालुका सचिव विल्सन गिरकर, महिला आघाडी शहराध्यक्षा भारती वाघ, जितेंद्र मेस्री, गुरू तोडणकर, संकेत वाईरकर या पदाधिकार्‍यांनी आज स्टेट बँक व युनीयन बँकेच्या शाखाधिकार्‍यांची भेट घेतली. राज्याची मराठी भाषा असावी व राज्यात अधिकारी, कर्मचार्‍यांनी मराठी भाषेचा वापर करून मराठीत पत्र व्यवहार आणि संभाषण करावे. अधिकारी, कर्मचार्‍यांना मराठी येणे सक्तीचे आहे. आस्थापनातील कामकाज व्यवहार मराठीत व्हावा यासाठी राज्य शासनाने सन २०१७ मध्ये शासन निर्णय केला आहे. मराठी भाषेला राज्यात अभिजात दर्जा मिळावा यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाला पाठविला आहे.बँकेतील अनेक अर्ज हे इंग्रजी व हिंदी भाषेतून आहे. त्यामुळे ते मागे पाठवून मराठी भाषेतील अर्ज उपलब्ध करून घ्यावेत. बँकेचे सर्व व्यवहार करताना मराठी भाषेला प्राधान्य द्यावे. ग्राहकांना मराठी भाषेशिवाय अन्य कोणत्याही भाषेची सक्ती करू नये. मालवणातील बर्‍याच बँकांमधील अधिकारी, कर्मचारी हे परप्रांतीय असून त्यांना मराठी बोलता येत नाही. ते हिंदी भाषेचा वापर करतात. मालवणातील सर्वच नागरिकांना तसेच ग्रामीण भागातील ग्रामस्थांना हिंदी समजत नसल्याने अधिकारी, कर्मचार्‍यांना मराठी शिकविण्याचा उपक्रम घ्यावा. ज्या कर्मचार्‍यांना मराठी येत नाही त्यांना शिकविण्यास आम्हीही तयार आहोत. ज्या अधिकारी, कर्मचार्‍यांना मराठीचे वावडे आहे त्यांना राज्यातून बाहेर जाण्यास सांगावे. या बाबीकडे गांभीर्याने लक्ष पुरवित आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणीही मनसेच्या पदाधिकार्‍यांनी शाखाधिकार्‍यांकडे केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा