You are currently viewing आई…

आई…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*आई…*

 

किती ही आठवले तरी तू…?

कागदावर मावणार आहेस का?

अगं.., तू मावशील असा कागदच अजून

विधात्याला निर्माण करता आला नाही कारण,

तू त्याच्याही पुढे निघून गेलीस आणि तो

फसला तो फसलाच, अजून काही त्याला मार्ग

सापडला नाही….

 

कारण जेव्हा जेव्हा तो तुला बघायला आला,

तेव्हा तेव्हा तू बाळाजवळ जागतांना त्याला

दिसलीस, दिवसाच्या रात्रीच्या कोणत्याही प्रहरी श्रीहरी आला असतांना तू त्याच्याकडे नजर वर करूनही पाहिले नाहीस कारण जेव्हा तेव्हा तू तुझ्या बाळातच गुंतलेली दिसली अविश्रांत अशी….

 

मग त्याला प्रश्न पडला की ही तीच आहे ना?

जिला मी आईपण दिले? ती तर मान वर करून बघतही नाही आपल्याकडे, इतके तिचे विश्व बदलले आहे. तिचा श्वास आणि तिचा भास ही बाळच आहे. तो उपाशी आहे का? त्याचे पोट भरले असेल ना? त्याला थंडी वाजते आहे का?

तो गादीवरून खाली तर पडणार नाही ना? त्याचे

कपडे बदलायला हवेत का? ओले तर नाहीत ना? त्याला सर्दी तर होणार नाही ना?

 

तो चांगली अंघोळ घातल्या शिवाय शांत झोपत

नाही, पाणी जास्त कडक तर नाही ना? त्याला तेल लावून जरा उन्हात धरायला हवे? माझे दूध

त्याला पुरते की नाही? त्याच्या साठी तरी मी चांगला आहार घ्यायला हवा नाही का? म्हणजे

त्याला दूध पुरेल. आता त्याला फळांचे सर, मऊ

भात तूप खाऊ घालू का? डॅा. ना विचारायला हवे. रात्री मला झोप तर लागून जात नाही ना? चुकून..? हो तो रडत राहिला तर…

 

आज त्याला लस दिली. म्हणून तापला का माझा बाळ? डॅा. कधी उतरेल हो ताप याचा? मला झोपच येत नाही हो. मांडीवरच घेऊन बसते

मी त्याला काय करू? काळजीने जीव हैराण होतो हो माझा..अशी किती वर्षे गेली. दिसामासाने तो वाढत राहिला पण तिच्या काळज्या काही संपल्या नाही. फक्त तो मोठा

होत गेला तशा त्या बदलत गेल्या फक्त. आता तो शाळेत जाऊ लागला मग चिंता अधिकच

वाढल्या. बसेल ना शाळेत नीट? की मी थांबू जवळ? खेळतांना पडणार तर नाही ना? अभ्यास

जमतोय ना त्याला? हजार प्रश्न वाढले. तिला

कशालाच सवड मिळाली नाही. अशी वर्षे निघून गेली. आता तो बाहेर शिकायला गेला. कसा राहिल माझ्या शिवाय? बाहेरचे जेवण? कसे

खाईल ते पांचट वरण कच्चा भात माझा बाळ?

आणि त्याला तर लोणकढे तूप लागते भातावर!

कसे पुरवू मी त्याला? रात्री तिथे तो नीट पांघरेल ना? डास तर चावणार नाहीत ना त्याला. मित्र

त्रास तर देणार नाहीत ना? डोळ्याला डोळा लागेना तिचा. देवाने पाहिले, अजूनही ही जागीच बाळासाठी? अशी कशी घडवली मी हिला, ही मलाच विचारत नाही. हिचा देव आता तिचा बाळ आहे. ती फक्त त्याची पूजा करते. माझी नाही.

 

मग, अशा तिला लिहिण्यासाठी देव अजून कागदच बनवतो आहे.. अजून तरी तो त्याला

सापडला नाही नि सापडणार ही नाही …कारण,

युगे नि युगे ती बदलली नाही.. बदलणार नाही..

ती असते … आ…..ई…..

जी शब्दात मावत नाही….

 

हे लिहितांनाच कष्टणारी माझी आई डोळ्यांसमोर आली. मी अंघोळ करून टॅावेल

गुंडाळून सहा सात वर्षांची अशी, आमच्या स्वयंपाक घरात सान्यातून सूर्य डोकावत प्रकाशाची तिरीप येत असे,मी त्या कोवळ्या किरणात तशीच दोन पायांवर बसे व तेवढ्यात

भाकरी चुरून त्यात थोडे ताक थोडे दूध घालून

कुस्करून आई माझ्यासमोर ताटली ठेवत असे.

कदाचित कपडे करेपर्यंत मला धीर निघत नसेल म्हणून ती लगेच ताटली माझ्यासमोर ठेवत असेल, माहित नाही. हा प्रसंग कसा माहित नाही माझ्या मनावर कोरला गेला व मी मला अजून त्या तिरीपे खाली

दोन पायांवर बसून जेवतांना दिसते. सारेच प्रसंग

का नाही आठवत हो लहानपणीचे? केली का आपण परतफेड त्याची? ती नाहीच होऊ शकत!

तिचे दळणे, कांडणे, भरडणे सारेच आठवते व ती

किती दमत असेल हे आठवून जीव कासाविस होतो.तिच्या सारखी सोशिक तिच! तिला उपमाच नाही पण तेव्हा हे कळत नव्हते ना? त्याचे काय करायचे? आता आठवून काय उपयोग हो? सारीच कामे घरी हो, सारीच कामे

घरी. ना गिरण्या ना मोलकरणी. सबकुछ आई!

आजही ती सबकुछ आहेच. कारण ती देवाची

प्रतिकृती आहे. प्रकृती आहे, परमेश्वर आहे.

 

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा