राजवाडा सावंतवाडी येथे दिनांक 23 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 रोजी दशावतार महोत्सवाचे आयोजन
भरतनाट्यम अविष्कार ही सादर होणार
सावंतवाडी
लोककला विभाग श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी( स्वायत्त) यांच्यावतीने गुरुवार दिनांक 23 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 रोजी लोककला महोत्सवाचे आयोजन राजवाडा सावंतवाडी येथे करण्यात आले आहे. या लोककला महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे.
सावंतवाडीचे युवराज लखमसावंत भोंसले यांच्या संकल्पनेतून येथील स्थानिक दशावतार कलाकारांना त्यांच्या कलेसाठी संधी उपलब्ध करून देणे व लोकांसाठी दर्जेदार दशावतार नाटकांचे आयोजन करणे ही या मागची संकल्पना आहे. रोज सायंकाळी 6.30 ते रात्री 10 वाजेपर्यंत दीड तासाचे दोन दशावतार नाट्य प्रयोग सादर केले जाणार आहेत.
यामध्ये दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी कलेश्वर नाट्य मंडळ नेरुर यांचा ‘ विधी संकेत’ तसेच जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ यांचा ‘नारायणी नमोस्तुते’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी नाईक मोचेमांडकर यांचा ‘राखणदार’ तसेच दत्त माऊली दशावतार मंडळ यांचा ‘देवी चंद्र लांबा परमेश्वरी’ हा प्रयोग होणार आहे.
दि.25 जानेवारी 2025 रोजी चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ यांचा ‘गिधाड घुबड संग्राम ‘ तर श्री सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा
‘विजयमणी ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे. संस्थेच्या विश्वस्त युवराज्ञी सौ श्रद्धाराजे भोंसले यांच्या संकल्पनेतून दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी भरतनाट्यम नृत्यांगणा अकॅडमी आॅफ फाईन आर्ट, मुंबई यांचा ‘सावंतवाडी अष्टनायीका’ हा भरतनाट्यम कार्यक्रम सादर केला जाणार आहे. यामध्ये सावंतवाडी राजघराण्याच्या राण्यांच्या भावनात्मक संघर्षाचा वेध घेतला जाणार आहे. राजघराण्यातील स्त्रियांना वारसा व परंपरा राखून ,प्रेम कर्तव्य व सहनशक्तीच्या सीमा पार कराव्या लागल्या त्यांचा जीवनसंघर्ष व पराक्रम या
भरतनाट्यम प्रयोगातून सादर केला जाणार आहे .तसेच चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळ यांचा ‘मुंबईची मुंबादेवी’ हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे .भरत नाट्यम हा एक तासाचा
नृत्याविश्कार असून सर्व दशावतार नाट्यप्रयोग दीड तासाचे असणार आहेत .समस्त कला प्रेमींनी आपल्या लोक कलाकारांच्या कलाविष्कारांचा तसेच भरतनाट्यम नृत्यविष्काराचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवराज लखमसावंत भोंसले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एल. भारमल यांनी केले आहे.