शालेय संस्कारांची शिदोरी यशासाठी उपयुक्त ठरते : प्रा. रुपेश पाटील
अण्णासाहेब द. वा. पाटील विद्यालयात युवा दिनानिमित्त व्याख्यान.
सावंतवाडी :
व्यक्तीच्या जीवनाला विधायक दिशा देण्यासाठी त्याला शालेय जीवनात मिळालेले संस्कार अत्यंत गरजेचे असून ते संस्कार निरंतर जोपासणे आवश्यक आहे. कारण शालेय जीवनातील संस्कार हेच आयुष्याला खरी विकासात्मक दिशा देऊन व्यक्तीला यशोशिखरावर पोहोचविण्यासाठी शिदोरी ठरतात, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी व्यक्त केले.
नगाव (ता. जि. धुळे) येथील अण्णासाहेब द. वा. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय युवा दिन अर्थात स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात प्रा. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, ज्येष्ठ शिक्षक जितेंद्र आर. पाटील, पी. के. पाटील, सौ. वैशाली पाटील, बी. एस. पाटील, राहुल पाटील, गिरीश सोनवणे, भूषण पाटील, अभिजीत पाटील व इतर सर्व शिक्षक उपस्थित होते.
प्रा. रुपेश पाटील यांनी आपल्या व्याख्यानात पुढे सांगितले की, स्वामी विवेकानंद भारत मातेचे एक आदर्श सुपुत्र असून राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ या संपूर्ण विश्वाला ‘आदर्श मातृत्व’ बहाल करणाऱ्या माता असून जगातील दोन महान छत्रपती घडविणाऱ्या विश्वगुरू आहेत. स्वामी विवेकानंदांना अपेक्षित युवक घडायचे असतील तर शालेय जीवनात घेतलेले संस्कार निरंतर जोपासणे आवश्यक आहे. तुम्ही कितीही मोठे व्हा, मात्र ज्या आई-बाबांनी तुम्हाला जन्म दिला त्यांना कधीही विसरू नका. आपल्या शाळेशी असलेले घट्ट नाते कधीही तोडू नका. माता आणि मातीला निरंतर जोपासून आयुष्य जगा. म्हणजेच इतरांना तुम्ही प्रेरणादायी ठराल, असे सांगत प्रा. रूपेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रेरणा गीते शिकविले.
दरम्यान, विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक जितेंद्र पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, नगाव ही अत्यंत गुणात्मक संस्कार करणारी पुण्यभूमी आहे. या शाळेने अनेक आदर्श विद्यार्थी घडविले आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आता शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीही तोच वारसा पुढे नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि निरंतर अभ्यास करावा, असे सांगत श्री. पाटील यांनी गतस्मृतींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यांच्या यशाचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. रुपेश पाटील यांचा विद्यालयातर्फे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व बाल शिवबा यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक भेरुलाल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन गिरीश सोनवणे यांनी केले.
या कार्यक्रमाचे संयोजन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी केले. यावेळी प्रा. पाटील यांनी विद्यार्थ्यांना जी प्रेरणा गीते शिकवली ती विद्यार्थ्यांनी आत्मसात करून प्रा. पाटील यांच्यासोबत प्रेरणा गीतांचा आनंद घेतला.