You are currently viewing कोलगाव ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी

कोलगाव ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी

लिंबू-तांदूळ जादूटोण्याकडे जिल्हावासीयांचे लक्ष.

संपादकीय

देश पातळीवर असो वा ग्राम पातळीवर सर्वसाधारण लोकांनी निवडणूक लढविणे अशक्य होतं चालले आहे. निवडणूक निर्धोक वातावरणात पार पाडावी, सगळ्यांना मतदानाचा अधिकार असावा, आणि आपल्या इच्छेनुसार सर्वांनी मतदान करावे हे आता स्वप्नच बनत चालले आहे. पाच वर्षातून येणाऱ्या निवडणुका म्हणजे आजकाल पैशांच्या जीवावर मतांचा बाजार भरतो आहे. पाच वर्षातून एकदा निवडणूक आली तरी सर्वसाधारण माणसे सुद्धा १०० ते २००० रुपयांना विकली जात आहेत. यापूर्वी गोरगरिबांना आमिषे दाखवली जात होती, परंतु अलीकडे सर्रास सुशिक्षित, नोकरदार मंडळी सुद्धा मतांसाठी पैसे घेताना दिसून येत आहेत. स्वतःच्या मताला एक किंमत असते, मान असतो तो जपण्यापेक्षा लोक मत विकताना दिसत आहेत.


जिथे सरळ मार्गाने लोक विकले जात नाहीत तिथे जादूटोणा, भानामती असे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रयोग केले जातात, ज्याद्वारे लोकांची नजरभुल करणे, लोकांना वश करणे अशी अघोरी कृत्ये केली जात आहेत. यामुळेच लोकशाही धोक्यात येऊन गुंडाशाही,दादागिरी,अरेरावी समाजात वाढली आहे. नेत्यांची, उमेदवारांनी पैसे देऊन मत विकत घेतल्याने निवडणुकीनंतर विकले गेलेले लोक नेत्यांना जाब विचारू शकत नाहीत. त्यामुळे लोकशाही असूनही देशात हिटलर शाही असल्याचाही अनुभव काही ठिकाणी येत आहे.
सावंतवाडी शहारा लगतच्या कोलगाव येथेही १५ जानेवारीस ग्रामपंचायत निवडणूक पार पडली, परंतु निवडणुकीच्या आदल्या रात्री कोलगावात प्रभाग चार/पाच मध्ये रस्त्यावर तांदळाच्या राशीवर मधोमध लिंबू ठेऊन हळद वाहून जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. ग्रामपंचायत पातळीवर असे अघोरी प्रकार सुरू झाल्याने लोकांमधून तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.
सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आहे. गेले दोन दिवस सर्वत्र शांतता आहे. परंतु उद्या मतमोजणी होणार असून सदरच्या निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो आणि लोकांचा विश्वास जिंकतो की जादूटोणा/भानामती विजयी होते याकडे कोलगाव वासीयांसाहित सर्व जिल्हावासीयांचा लक्ष लागून राहिला आहे..

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =