*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट*
भाग:६०
*निर्वासित*
“तुझ्याकडची येक बरीशी बॅग माका दी.” काकल्या आल्या आल्या म्हणाला.
“का रे? कुठे जातोयस?” मी विचारले.
“मुंबयक्.” काकल्याचा स्वर मंद होता.
“वा! छानच. ये जाऊन.” मी त्याची पाठ थोपटत सांगितलं. तेवढ्यात मुलाने त्याला एक जुनी व बरीशी सुटकेस आणून दिली.
“ये जावून काय? चेडू घेवन् जाताहा. पून येवचो भरोसो नाय, आनी तू पाटवची तयारी सोमती केलय.” काकल्या वैतागत म्हणाला.
“असं कसं? महिन्याभरात येशीलच ना?” मी अजून सहजगत्याच बोलत होतो. तेवढ्यात काकल्याने मला धक्का दिला.
“अरे झील आनी सून माका भौतेक कंठाळली. तेवा चेडू हुंता ‘घेवन जातय बाबाक.’ खुय माजी रवानगी करता ता बगया. आश्रम तर नशिबात नाय, कारण तडे पैसो मोजूचो लागता. माका काय तुजेसारखी पेंशनय नाय. फुकटो आश्रम सोदूक मी निराधार पून नाय. तेमुळे कोंच्यातरी आश्रयाक रवान दिस काढूक होये झाला. गावात्सून निर्वाशित होवन् मी मुंबयक चल्लय.”
काकल्याच्या डोळ्यात आज पाणी तरळत होते. त्याने एक भीषण प्रश्न माझ्यासमोर ठेवला होता.
पिढी पिढीत अंतर वाढत चाललंय. वृद्धांची घरांना अडचण होत आहे, तरुण प्राप्त परिस्थितीत हतबल होत आहेत, जुळवून घेण्याची क्षमता कमी होत आहे. नव्या सुना कमावत्या आहेत, त्यामुळे त्यानाही परिस्थिती हाताळणे कठीण होत आहे.
“मग गाव सोडतोस की काय?” मी त्याचा हात हातात घेत विचारलं.
“तसो सोडूचो नाय होतो. काळजात्सून सुटाचोय नाय. आमका गावंढळ मानसाक गाव हुंजे स्वर्ग आनी शहर हुंजे नरक. सुद्ध हवा, गायचा दूध, शंभर टक्के नैसर्गिक भाजये आजून हडे हत. हयतो दारातलो फणस बघ. त्येका तू काय दितंस? पावसाचा चार म्हयने पाणी खावन तो जगताहा. फणस ,चिकू, करवंदा आमका दिवक बसलीत; आनी आमची वाट नरकाकडे.” काकल्या फारच हळवा झालेला. तो बोलत राहिला.
“ह्या सगळा शहरात कसा मेळात? दारा बन करून एशीत निजणा ह्यो आमका नरक मरे.”
“अरे , गाव पण बदलत चाललाय.” मी त्याला थोडा धीर देत म्हणालो.
“पूरो नसात, पून थोडो भितर बरबाटलोहा ह्या खरा. गावचा प्रेम यवारात बदालताहा ह्याय खरा.” काकल्या म्हणाला.
“आपण काही करू शकतो कारे?” मी थोडी संधी साधून विचारले.
काकल्या म्हणाला, “हेच्यात्सून आंग काढून घेणा ह्योच उपाय हा. खरातर सरकारान ह्या लाडक्या म्हाताऱ्यांची सोय करूक हयी होती. सरकारी हास्पिटला तशे सरकारी वृद्धाश्रम काडूक होये. अभिमानान जगाक तरी मेळात मरे.”
काकल्या एकंदरीत खूपच दूखावला होता. त्याला गाव सोडवत नव्हता, त्याचा पाय निघत नव्हता; तरीही तो उठला. मी दिलेली रिकामी सुटकेस त्याने उचलली आणि भरकन निघाला. परत यायचा वादा न करताच तो निघाला होता.
*विनय वामन सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802
