कणकवली भाजी मार्केट इमारतीचे काम तात्काळ थांबवा..

कणकवली भाजी मार्केट इमारतीचे काम तात्काळ थांबवा..

मुदतवाढ न घेताच बांधकाम सुरू असल्याबाबत ग्लोबल असोसिएटला मुख्याधिकाऱ्यांची नोटीस

कणकवली

कणकवली शहरात ग्लोबल असोसिएटमार्फत आरक्षित जागेवर विकसित करण्यात येत असलेली भाजी मार्केट इमारत व अन्य दोन विंगच्या इमारतीचे बांधकाम कराराला मुदतवाढ न घेताच सुरू असल्याने सदर बांधकाम तात्काळ थांबविण्या​ची नोटीस कणकवली मुख्याधिकारी यांच्यामार्फत ग्लोबल असोसिएटला काढण्यात आली आहे. सदर भाजी मार्केट हस्तांतरण करण्याची मुदतवाढ संपल्याने सदर मुदत वाढीबाबत कणकवली नगरपंचायत सभागृहाने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. कणकवली नगरपंचायतच्या ४ जानेवारी रोजी झालेल्या विशेष बैठकीत सदर मुदत वाढीबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. असे असताना करार पत्रातील अट क्रमांक ​२७ प्रमाणे मुदतवाढ न घेताच ग्लोबल असोसिएटमार्फत सदर इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम​ १९६६ च्या कलम ​५४ नुसार नोटीस काढण्यात आली असून नोटीस मिळाल्यापासून सदर बांधकाम तात्काळ थांबवावे अशा सूचना नगरपंचायत मुख्याधिका​ऱ्यांनी ग्लोबल असोसिएटला दिले आहेत. अन्यथा उचित कारवाई करण्याचा इशारा या नोटीस द्वारे देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा